मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमुळे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल का, अशी चर्चा रंगली असतानाच यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांच्या सभांमुळे चांगला प्रभाव पडेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. जनतेचा मोदींवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मोदींच्या सभेला गर्दी जमवावी लागते, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी बारामतीत मतदान केले. मतदानानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यंदाच्या निवडणुकीत भाजपा- राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली होती. विखारी प्रचार सुरु असल्याचेही दिसून आले. याबाबत अजित पवार म्हणाले, आम्ही सुरुवात केली नाही. भाजपाने सुरुवात केली होती. शरद पवार देशभरात फिरतात. पण शरद पवार कधी असे टोकाचे आरोप करत नाही. पण यंदा शरद पवारांना असे आरोप करावे लागले. त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य होते. ५२ वर्षे आम्ही चांगले काम केले. आता जी कामं अपूर्ण आहेत ती देखील आम्हीच पूर्ण करणार असे त्यांनी सांगितले.

भाजपाची लोकं फक्त निवडणुकीत येतात. महादेव जानकर यांना गेल्या निवडणुकीत बारामतीतून चांगली मते मिळाली होती. पण निवडणुकीनंतर ते एकदाही या भागात फिरले नाही. पण आम्ही १२ महिने जनतेसोबत असतो, असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंच्या सभांचा फायदा होईल का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंच्या सभांमुळे चांगला प्रभाव पडणार. पूर्वी मोदींच्या सभेला गर्दी व्हायची, पण लोकांचा आता मोदींवर विश्वास नाही. त्यामुळे वर्धा येथील सभेला गर्दीच झाली नव्हती. आता काही लोकांना गर्दी जमवावी लागते. गाड्यांची सोय करावी लागते. पण आमच्या इथे तसं करावं लागत नाही, असे सांगत अजित पवारांनी भाजपाला चिमटा काढला.