Rohit Pawar Post on Indira Gandhi: भारत व पाकिस्तान यांच्यातील वातावरण सध्या प्रचंड तणावपूर्ण झालं असून सध्या दोन्ही देशांनी शस्त्रविरामावर सहमती दर्शवली आहे. ७ मे पासून १० मेपर्यंत पाकिस्तानच्या आगळिकीला भारतीय लष्करानं सडेतोड उत्तर देत फक्त त्यांचे हल्ले निष्प्रभ केले नाहीत, तर थेट पाकिस्तानच्या हद्दीत त्यांच्या हवाई तळांवर हल्ले चढवले. यामुळे पाकिस्तान जेरीस आला आणि शस्त्रविरामास सहमती दर्शवली. या पार्श्वभूमीवर आता इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
“तेव्हाचे सत्ताधारीही थोर व विरोधी पक्षही थोर”
१९७१ साली झालेल्या युद्धात भारताचा विजय झाला होता. तेव्हा पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तानपासून पूर्णपणे वेगळं करून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती करण्यात भारताला यश आलं होतं. या घडामोडींचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्या वेळचे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोघेही थोर होते, असंही रोहित पवारांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
“१९७१ च्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाच्या नवीन देशाला जन्म दिला. तेव्हाची ही घटना आहे”, असं म्हणत रोहित पवारांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टला सुरुवात केली.
काय घडलं १९७१ मध्ये?
“१९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचे बांगलादेश) स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीगने पाकिस्तानच्या निवडणुकीत बहुमत मिळवले. परंतु पश्चिम पाकिस्तानच्या सत्ताधारी वर्गाने सत्ता सोपवण्यास नकार दिला. यामुळे पूर्व पाकिस्तानात हिंसाचार आणि अत्याचार वाढले आणि सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले”, असं या पोस्टमध्ये रोहित पवारांनी लिहिलं आहे.
“इंदिरा गांधींची कणखर भूमिका”
“पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवले. हा एक प्रकारे भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून भारताने युद्धात हस्तक्षेप करू नये. पण इंदिरा गांधी यांनी या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांना स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेने पाकिस्तानला आवरले नाही तर भारताला कारवाई करावी लागेल”, असा उल्लेख रोहित पवार यांनी केला आहे.
“इंदिरा गांधींनी लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ यांना पूर्ण स्वातंत्र्य देत युद्धाची तयारी केली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले केले आणि भारताने प्रत्युत्तरात युद्ध पुकारले. अवघ्या १३ दिवसांत भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात निर्णायक विजय मिळवला आणि १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी शरणागती पत्करली”, अशी माहिती रोहित पवारांनी पोस्टमध्ये दिली आहे.
अटल बिहारी वाजपेयींचाही केला उल्लेख
“पाकिस्ताने दोन तुकडे होऊन बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतरच इंदिरा गांधी यांनी युद्धविराम घोषित केला. कारण त्या इंदिरा गांधी होत्या… आयर्न लेडी! त्यावेळी विरोधी पक्षात असलेले नेते अटलबिहारी वाजपेयी साहेबांनीही आदराने ‘दुर्गा’ या शब्दांत त्यांचा उल्लेख केला होता. म्हणूनच इंदिरा गांधी या कणखर नेत्याच्या साहस, स्वाभिमान, देशप्रेम आणि नेतृत्वगुणाची आजही उजळणी होते”, अशा शब्दांत रोहित पवारांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत गौरवोद्गार काढले आहेत.
“एकमेकांचा सन्मान राखणारे, मोठेपण मान्य करणारे आणि अंगी दिलदारपणा, देशप्रेम असणारे, कोणत्याही महासत्तेपुढे न झुकणारे थोर ते तत्कालीन सत्ताधारी आणि थोर ते तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते”, असा उल्लेख पोस्टमध्ये शेवटी रोहित पवारांनी केला आहे.