अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘जेएनयू’तील घडामोडींच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून अपेक्षेप्रमाणे सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला. विरोधकांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ‘जेएनयू’ प्रकरणात सरकारने काही लपवावे किंवा चिंता करावी, अशी कोणतीही गोष्ट नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांनी हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येविषयी विचारणा केली असता, यूपीएच्या कार्यकाळात या विद्यापीठात १० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे नायडू यांनी सांगितले. या सगळ्याला जबाबदार कोण? कोणामुळे अशाप्रकारचे वातावरण निर्माण झाले? असा प्रतिसवाल नायडू यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची विरोधकांकडून खिल्ली 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या ‘जेएनयू’संदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘जेएनयू’त जे काही घडले त्यामुळे देश अस्वस्थ झाला आहे. विद्यापीठात भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे जनता अस्वस्थ आहे. याविषयी चर्चा झाली पाहिजे. याबाबतीत आम्ही लपवावे किंवा चिंता करावी, अशी कोणतीही गोष्ट नाही. कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास आमची हरकत नसल्याचे व्यंकय्या नायडू यांनी पत्रकारांना सांगितले. ‘जेएनयू’त काही आक्षेपार्ह गोष्टी घडल्या. आता त्यावर पांघरूण घालण्यासाठी काही लोक विद्यापीठाची बदनामी करत आहेत. सरकार जेएनयू बंद करण्याच्या विचारात आहे, असा अपप्रचार सध्या सुरू आहे. हा गैरसमज पसरविण्याचा आणि सरकारला लक्ष्य करण्याच्या रणनीतीचा भाग आहे. मात्र, हे पूर्णत: चुकीचे असून विद्यापीठ प्रश्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे नायडू यांनी म्हटले.

पोलिसांना विद्यापीठात प्रवेश नको, देशद्रोहाचा आरोप मागे घ्या- ‘जेएनयू’ शिक्षक संघटनेची मागणी