ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव फार वेगाने होतोय पण त्यामुळे फार कमी प्रमाणात व्हायरल फिव्हरसारखा त्रास होतो, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलंय. सोमवारी पत्रकारांशी ओमायक्रॉनसंदर्भात भाष्य करताना योगी यांनी हे वक्तव्य करण्याबरोबरच करोनाच्या या नव्या विषाणूमुळे घाबरण्याचं कारण नसल्याचं म्हटलंय. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याचं पार्श्वभूमीवर योगी यांनी हे आवाहन केलं आहे.
“ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने होतो पण त्यामुळे फार सौम्य त्रास होतो. हा विषाणू कमजोर झालाय. हा एखाद्या व्हायरल फिव्हरप्रमाणे आहे. मात्र काळजी घेणं आवश्यक आहे. तरीही घाबरुन जाण्याची गरज नाहीय,” असं योगींनी म्हटल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलंय.
ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे घातक नाहीय. ओमायक्रॉनची बाधा झालेले रुग्ण चार ते पाच दिवसांमध्ये पूर्णपणे बरे होते आहेत, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.
“मार्च आणि एप्रिलमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होत होता तेव्हा असं दिसून आलं होतं की लोकांना बरं होण्यासाठी १५ ते २५ दिवसांचा कालावधी लागत होता. या विषाणूमुळे आरोग्यासंदर्भातील समस्याही निर्माण होत असल्याचं दिसून आलं होतं. मात्र असं ओमायक्रॉनसंदर्भात होताना दिसत नाहीय,” असं योगींनी म्हटलंय.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यापासून उत्तर प्रदेशात या नवीन प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झालेले आठ रुग्ण आढळून आलेत. या आठपैकी चार जणांनी करोनावर मात केल्याचं आरोग्य खात्याच्या आकडेवारीमध्ये म्हटलंय.