Operation Sindoor Sachin Tendulkars Reaction: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर या दोन्ही ठिकाणी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले आहेत. लष्कराने केलेल्या या यशस्वी कारवाईनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, शिखर धवन आणि हरभजन सिंग यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.
सचिन तेंडुलकरने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “एकतेत ताकद आहे, आणि त्या ताकदीला सीमा नाही. भारताची खरी ढाल म्हणजे भारताचे नागरिक आहेत. दहशतवादाला या भूमीत स्थान नाही. आम्ही एकजुट आहोत.”
जे म्हटलं होतं, ते करून दाखवलं…
दुसरीकडे भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशावर प्रकाश टाकणारा एक फोटो शेअर केला आणि त्याला, “जे म्हटले होते, ते करून दाखवले. न्याय मिळाला. भारत माता की जय!”, असे कॅप्शन दिले आहे. शिखर धवनची ही पोस्ट अनेकांना भावली असून, यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिाय येत आहेत.
हरभजन सिंग काय म्हणाला?
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये तो म्हणाला की, “जय हिंद. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले उत्तर आहे.”
दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त
विशेष आणि अचूक शस्त्रास्त्रांचा वापरून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर द्वारे एकाच समन्वित हल्ल्याद्वारे नऊ दहशतवादी ठिकाणे नष्ट करण्यात आली. भारतीय सैन्याने बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोटमधील प्रमुख ठिकाणांसह पाकिस्तानमधील चार दहशतवादी तळांना लक्ष्य केले आणि ते नष्ट केले, तर पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मधील इतर पाच ठिकाणांनाही यशस्वीरित्या लक्ष्य करण्यात आले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय सैन्याने ही ठिकाणे निवडली. १९७१ नंतर पाकिस्तानच्या निर्विवाद हद्दीत भारताने केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता. गेल्या पाच दशकांमधील पाकिस्तानी हद्दीत नवी दिल्लीने केलेली ही सर्वात मोठी लष्करी कारवाई आहे.