P Chidambaram Remark on 26/11 Mumbai Terror attack : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नव्हतं. जागतिक दबाव व परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेमुळे भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. चिदंबरम म्हणाले, प्रत्युत्तर देण्याचा विचार माझ्या मनात आला होता. परंतु, सरकारने लष्करी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, भाजपाने चितंबरम यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. हा खुलासा करायला काँग्रेसने खूप उशीर केला असल्याची टिप्पणी भाजपाने केली आहे. तसेच हा खूप छोटासा खुलासा असल्याचं म्हटलं आहे.
चिदंबरम काय म्हणाले?
चिदंबरम म्हणाले, “मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांत मी केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. आपली पुढची पावलं कशी असतील यावर केंद्रीय पातळीवर चर्चा चालू असतानाच अख्खं जग नवी दिल्लीला सांगत होतं की युद्ध सुरू करू नका.
अमेरिकेचा दबाव?
“मी गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन-तीन दिवसांनी अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री कॉन्डोलीझा राइस या भारताच्या पंतप्रधानांना (मनमोहन सिंग) आणि मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी तेव्हा सांगितलं की ‘कृपया तुम्ही प्रतिसाद देऊ नका.’ मी त्यांना सांगितलं की हा निर्णय आमचं सरकार घेईल. परंतु, तेव्हा पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा विचार माझ्या मनात आला होता. दरम्यान, राइस यांनी पंतप्रधानांशी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींशी या विषयावर चर्चा केली.”
“हल्ला चालू असताना आपल्या पंतप्रधानांनी देखील पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा विचार केला होता. मात्र, जो निर्णय आपल्या सरकारने त्यावेळी घेतला त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा व व परराष्ट्र सेवेचा (आयएफएस) प्रभाव होता. रणांगणात उत्तर देणं टाळावं असा निर्णय त्यावेळी घेतला गेला.”
२६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर-ए-तैय्यबा या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेतील १० दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत दाखल झाले हेते. त्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय हॉटेल, ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा रुग्णालय आणि नरीमन हाऊसवर सशस्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात १७५ जण मृत्यूमुखी पडले होते. १० दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब याला मुंबई पोलिसांनी पकडलं होतं. त्याला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली.