Pakistan Afghanistan Conflict 2025 : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांमध्ये ११ आणि १२ ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात संघर्ष उफाळून आला. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले आणि सीमावर्ती भागांतील चौक्यांवर हल्ला चढवला, तर अफगाणिस्ताननेही पाकिस्तानच्या अनेक सीमावर्ती तळांवर हल्ला करत प्रत्युत्तर दिलं. यामुळे दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संघर्षाबाबत मोठी अपडेट समोर आली असून दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याची घोषणा कतारने केली आहे. कतारच्या दोहा या ठिकाणी आयोजित शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अशी घोषणा कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सकाळी केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या युद्धबंदीच्या चर्चेत कतार आणि तुर्कीने मध्यस्थी करत महत्वाची भूमिका बजावली आहे. कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या या युद्धबंदीच्या चर्चेचा उद्देश हा एका आठवड्यापासून सुरू असलेल्या तीव्र संघर्षांना थांबवणं आहे. कारण या संघर्षात डझनभर लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत.

कतारच्या निवेदनानुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही बाजूंनी युद्धबंदीची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी आणि विश्वासार्ह आणि शाश्वत पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या काही दिवसांत पुढील बैठका घेण्याचं मान्य करण्यात आलं आहे. तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने याबाबत सांगितलं की, “अफगाणिस्तानातून पाकिस्तानविरुद्ध होणारा सीमापार दहशतवाद संपवण्यासाठी आणि पाक-अफगाण सीमेवर शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबवण्याबाबत ही चर्चा केंद्रित होती.

पाकिस्तानचा नेमका आरोप काय?

२०२१ मध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान झालेला हा सर्वांत मोठा आणि विनाशकारी संघर्ष होता. पाकिस्तानमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी गटाला अफगाणिस्तानकडून आश्रय दिला जात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तालिबान सरकारने मात्र हा दावा फेटाळून लावला असून, उलटपक्षी पाकिस्तानलाच इशारा दिला आहे. तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी नुकताच भारताचा ऐतिहासिक दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानला दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार धरले होते. सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया करून, पाकिस्तान हा शेजारील राष्ट्रांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका मुत्ताकी यांनी केली होती.

सौदी अरेबिया आणि कतारची भूमिका काय?

सौदी अरेबियाने नुकताच पाकिस्तानबरोबर परस्पर संरक्षण करार केला आहे. दोन्ही राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी समाजमाध्यमांवर युद्धाबाबत चिंता व्यक्त केली आहे. “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या तणाव आणि संघर्षावर आम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहोत”, अशी पोस्ट सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून शेअर केली आहे.

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान व अफगाणिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. संवाद आणि कूटनीतीच्या मार्गातून सकारात्मक तोडगा काढावा, असे कतारने म्हटलं होतं. या घडामोडींमुळे दक्षिण आशियात पुन्हा एकदा भू-राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढली होती.