Pakistan Nominates Donald Trump for Nobel: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विधानं कायमच चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच त्यांनी ‘आय लव्ह पाकिस्तान’ असं विधान केल्यानंतर त्यांना अचानक पाकिस्तान प्रेमाचा उमाळा का आला आहे? यावर चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर एकीकडे ट्रम्प यांनी पाकिस्तान प्रेमाचे गोडवे गायले असताना दुसरीकडे पाकिस्तान सरकारनं चक्क शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तान सरकारवर त्यांच्याच देशातल्या आजी-माजी नेतेमंडळींनी टीका करायला सुरुवात केली आहे.

इराणवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानात ट्रम्पविरोध

अमेरिकेने रविवारी २२ जून रोजी पहाटे इराणमधील तीन आण्विक तळांवर हवाई हल्ला केला. इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही, अशी ठाम भूमिका ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर इराणमधील अणुकार्यक्रमाला अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे. रविवारी केलेले हल्ले हे अमेरिकेच्या त्याच भूमिकेचा एक भाग असल्याचंही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे इस्रायलय विरुद्ध इराण या युद्धात अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने उतरल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या या निर्णयावर पाकिस्तानमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची नोबेलसाठी शिफारस

पाकिस्तान सरकारनं काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली होती. भारत व पाकिस्तान यांच्यात पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून संभाव्य युद्ध टाळल्याचं कारण पाकिस्तानकडून यासाठी देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, पाकिस्तानातील संबंधित समितीच्या शिफारशीनंतर देशाचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री इशक दार यांनी या शिफारस पत्रावर सही करून ते नॉर्वेतील नोबेल शांतता पुरस्कार समितीकडे पाठवूनही दिलं आहे.

गेल्या काही दिवसांतील घडामोडी…

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर यांनी नुकतीच व्हाईट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आय लव्ह पाकिस्तान’ म्हणत मुनीर यांची डिनर डिप्लोमसी यशस्वी ठरल्यावरच शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर पाकिस्तानकडून नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.

अमेरिका युद्धात उतरली आणि पाकिस्तानला चूक उमगली

दरम्यान, इस्रायल व इराणमधील युद्धात अमेरिका उतरल्यानंतर पाकिस्तानला चूक उमगल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेनं रविवारी इराणवर हल्ले केल्यानंतर सोमवारी पाकिस्तानमधील अनेक आजी-माजी नेतेमंडळी व देशातील मान्यवर व्यक्तींकडून ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा यासंदर्भातल्या देशाच्या शिफारसीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे. पाकिस्तान सरकारदेखील या मागणीचा पुनर्विचार करण्यासंदर्भात आढावा घेत असल्याचं सांगितलं जात आहे.

Donald Trump india pakistan war
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धविरामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. (PC : Reuters/Freepik)

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) या प्रमुख विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी अली मुहम्मद खान यांनी त्यांच्या सोशल पोस्टवर याबाबत पोस्ट केली आहे. “अमेरिकेनं इराणवर हल्ला केला असून गाझामध्ये इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या हत्याकांडाला समर्थन दिलं आहे”, असं खान यांनी नमूद केलं आहे. शिवाय पीटीआय पक्षानं स्वतंत्र पोस्टमध्ये अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध केला असून इराणच्या सार्वभौमत्त्वाला पूर्ण पाठिंबा असल्याचं नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानमधील ज्येष्ठ राजकीय नेते मौलाना फझलूर रेहमान यांनीही हीच मागणी केली आहे. “शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे फोल ठरले आहेत. नोबेल पुरस्कारासंदर्भातील शिफारस आपण मागे घ्यायला हवी. आसीम मुनीर यांच्यासह ट्रम्प यांनी जेवण केल्यामुळे पाकिस्तानी सत्ताधारी इतके खूश झाले आहेत की त्यांनी थेट ट्रम्प यांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली आहे”, असं रेहमान म्हणाले.