पीटीआय, पणजी
नौदलाचा दरारा, हवाई दलाचे असाधारण कौशल्य आणि लष्कराचे शौर्य या त्रिसूत्रीमुळेच ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतासमोर पाकिस्तानला गुडघे टेकायला लागले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. गोवा किनारपट्टीनजिक आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर जवानांबरोबर पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली.
आयएनएस विक्रांत हे ‘आत्मनिर्भर भारता’चे शक्तीशाली प्रतीक असून काही महिन्यांपूर्वी याच युद्धनौकेने पाकिस्तानची झोप उडवली होती. नावाप्रमाणेच या युद्धनौकेने शत्रू सैन्याचे धैर्यच नेस्तनाबूत केले. जेव्हा शत्रू समोर असते आणि युद्ध अपरिहार्य होते, तेव्हा ज्या बाजूने स्वबळावर स्वत:ती क्षमता सिद्ध केलेली असते, तिलाच युद्ध जिंकण्याची जास्त संधी असते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्यदलाने तेच सिद्ध केले असून त्यासाठी ते विशेष मानवंदनेचे अधिकारी आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान ब्राह्मोस, आकाश ही भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र सामर्थ्याची प्रतीके ठरली. आता या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी जगातील अनेक राष्ट्रांनी इच्छा व्यक्त केली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
एके काळी सैन्य दलाकडून वापरली जाणारी हजारो उपकरणे व सामग्री आयात करावी लागत होती. पण आता त्याची निर्मिती भारतात होत आहे. गेल्या ११ वर्षांत देशात संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांची निर्मिती तिपटीने वाढली असून गेल्या वर्षी त्या उलाढालीचा आकडा दीड लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. भारत आता या उत्पादनांच्या निर्यातीच्या दिशेनेही वाटचाल करत आहे. गेल्या दशकात संरक्षणविषयक सामग्रीची निर्यात ३० पटीने वाढली असून येत्या काळात संरक्षण उत्पादन निर्यातदार देशांच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या मागे संरक्षण उत्पादनाच्या निर्मिती करणाऱ्या नवउद्यमींना अधिक श्रेय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर मोदी यांनी रविवारी संध्याकाळनंतर पूर्ण रात्र नौदलाच्या अधिकारी, जवानांसोबत हितगुज करत घालवली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत युद्धनौकेवरील ‘मिग २७’ या लढाऊ विमानाचे हवाई संचलनही पार पडले. आयएनएस विक्रांत ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची पहिली सर्वात मोठी लढाऊ विमानवाहू युद्धनौका ठरली असून २०२२ मध्ये ती नौदलाच्या सेवेत दाखल झाली.
आयएनएस विक्रांतच्या निर्मिती झाल्यानंतर भारतीय नौदलाने ब्रिटिश वसाहतवादाचे प्रतीक मोडीत काढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने भारतीय नौदलाने नवा ध्वज स्वीकारला, हेदेखील उल्लेखनीय ठरले आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान