Parliament Monsoon Session 2025 : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सध्या संसदेत चर्चा सुरू आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरसंदर्भात चर्चा पार पडत आहे. या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरवरून आणि भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवरून अनेक सवाल विचारले आहेत.

आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवरून धारेवर धरलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा दाखला राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. भारताने ३० मिनिटांमध्ये पाकिस्तानसमोर सरेंडर केलं म्हणत राहुल गांधींनी भारत सरकारवर घणाघात केला.

राहुल गांधी काय म्हणाले?

“पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला झाला. पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्ष सरकारच्या आणि सैन्याबरोबर उभे होते. पहलगाम हल्ल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्यांच्या एका कुटुंबियांच्या घरी गेलो होतो. तेव्हा मला वाटलं की मी माझ्या कुटुंबियाबरोबर बसलो आहे. तेव्हा त्यांनी मला त्यांच्या मुलाचे काही फोटो दाखवले. त्यानंतर मी उत्तर प्रदेशातील आणखी एका कुटुंबियाला भेटलो. पतीला पत्नीसमोर गोळी झाडल्याचं मला त्यांनी सांगितलं. खरं तर या घटनेबाबत ऐकलं तरी खूप दु:ख होतं. जी घटना झाली ती खूप चुकीची झाली. आम्ही राजकारणात काम करत असताना जनतेत जात असतो. जेव्हा मी काही जवानांना भेटतो तेव्हा त्यांचा हात हातात घेतला तरी समजतं की हे भारतीय जवान आहेत. खरं तर भारतीय सैन्य म्हणजे वाघ आहेत. त्यामुळे वाघाला पूर्ण स्वातंत्र्य द्यावं लागतं”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

“भारतीय सेना आणि भारतीय नेव्हीचा प्रयोग जर करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याबरोबर १०० टक्के पाठिंबा असला पाहिजे. जर सैन्याचा प्रयोग करायचा असेल तर सैन्याला पूर्ण सूट द्यायला हवी. भारतीय सैन्य म्हणजे वाघ आहेत. त्यामुळे वाघाला पूर्ण स्वातंत्र्य द्यावं लागतं. भारतीय सैन्याला एखाद्या ऑपरेशनसाठी पूर्ण सूट द्यायला हवी”, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राजनाथ सिंहांच्या वक्तव्याचा दाखला देत राहुल गांधींची टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी दावा केला की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ऑपरेशन सिंदूर दरम्यान डीजीएमओंना लष्करी कारवाईमध्ये वाढ न करण्याचे निर्देश दिले होते. तसेच युद्धबंदीची विनंती करावी असे निर्देश दिले होते”, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला फोन करून सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या बिगर-लष्करी भागावर हल्ला केला, या संदर्भातील राजनाथ सिंह यांच्या विधानाचा दाखला देत भारताने ३० मिनिटांमध्ये पाकिस्तानसमोर सरेंडर केलं असं म्हणत केंद्र सरकारवर राहुल गांधी यांनी टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं की, “काल मी राजनाथ सिंह यांचं भाषण पाहिलं. लोक बोलतात तेव्हा मी खूप लक्षपूर्वक ऐकतो. त्यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर पहाटे १.०५ वाजता सुरू झालं. त्यांनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर २२ मिनिटे चाललं. मग त्यांनी सर्वात धक्कादायक गोष्ट सांगितली. १.३५ वाजता आम्ही पाकिस्तानला फोन करून सांगितलं की आम्ही कोणत्याही लष्करी भागांना लक्ष्य केलेलं नाही. आम्हाला यात कोणताही संघर्ष वाढवायचा नाही. कदाचित त्यांना त्यांनी काय म्हटलं हे समजत नसेल. ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच भारताच्या डीजीएमओंना रात्री १.३५ वाजता युद्धबंदीची मागणी करण्यास सरकारनं सांगितलं होतं. तुम्ही थेट पाकिस्तानला तुमची राजकीय इच्छाशक्ती सांगितली की तुमच्याकडे लढण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.