गोवा आणि मणिपूरमधील सत्तासंघर्षाच्या झळा मंगळवारी संसदेलाही बसल्या. भाजपवर घोडेबाजाराचा आरोप करत काँग्रेस खासदारांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेत काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.
गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष असला तरी दुस-या स्थानी असलेल्या भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. छोट्या पक्षांचा आधार घेत भाजपने सत्ता स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. तर अंतर्गत मतभेद आणि संथगतीच्या कारभारामुळे काँग्रेसला बहुमत असूनही सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. छोट्या पक्षांचा पाठिंबा घेताना भाजपने त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिल्याचे सूत्रांकडून समजते. तर दोन्ही राज्यांमधील काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे.
मंगळवारी संसदेत काँग्रेसने गोवा आणि मणिपूरमधील राजकीय परिस्थितीवरुन गोंधळ घातला. काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव मांडला. संसदेचे कामकाज सुरु होताच काँग्रेस खासदारांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर लोकसभेत काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.
संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, गोवा आणि मणिपूरमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. आम्हाला अन्य पक्षांनी सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला असे त्यांनी सांगितले. तर काँग्रेसचे खासदार सत्यव्रत चतुर्वेदी यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. ‘जेव्हा करायला पाहिजे होते त्यावेळी बदल केले नाही, आता पक्ष संघटनेत बदल करुन काय उपयोग’ असा प्रश्न त्यांनी विचारला. संसदेबाहेर प्रसारमाध्यमांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यातील मुख्यमंत्रीपदावरुन टीका करणा-या काँग्रेसला नितीन गडकरी यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार देऊ शकत नाही ते राज्य काय चालवणार असा प्रश्न उपस्थित करत नितीन गडकरी यांनी काँग्रेसने अपयशासाठी दुस-यांकडे बोट दाखवणे बंद करावे असे म्हटले आहे.
छत्तीसगडमधील सुकमामध्ये गेल्या आठवड्यात नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले होते. यावरुनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सुकमामधील हल्ला हा गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे असे दावा काँग्रेसने केला आहे.