सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची विमानात प्रवाशांसोबत वादावादी सुरु आहे. यामध्ये एका चिडलेला पुरुष प्रवाशी प्रज्ञासिंह यांना नियमाची आठवण करुन देत तुमच्यामुळं इतर प्रवाशांना त्रास होत असल्याचे बोलताना दिसत आहे.

खासदार ठाकूर या शनिवारी दिल्लीहून भोपाळला स्पाइसजेटच्या विमानाने निघाल्या होत्या. यावेळी त्या ज्या फर्स्ट क्लास विभागात बसल्या होत्या. तिथल्या काही प्रवाशांशी त्यांचा जागेवरुन वाद झाला. आपल्या जागेबाबत ठाम राहिलेल्या ठाकूर यांच्या उत्तरांवर हा प्रवाशी व्हिडिओमध्ये चिडताना दिसतो आहे. चिडल्यानंतर तो ठाकूर यांना सुनावताना म्हणतो की, “आपल्याला थोडीशी तरी नैतिकता दाखवायला हवी. आपल्यामुळे एकाही प्रवाशाला अडचण होता कामा नये, असं आपण वागायला हवं. आपण लोकप्रतिनिधी आहात आपल्याला लाज वाटायला हवी की आपल्यामुळे ५० लोकांची अडचण होत आहे.”

प्रवाशाने अशा प्रकारे सुनावल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी त्याच्या ‘लाज वाटायला हवी’ या वाक्यावर आक्षेप घेतला आणि त्या म्हणाल्या, तुम्ही जरा भाषा सांभाळून वापरा. त्यावर उत्तर देताना त्या व्यक्तीने म्हटले की, मी योग्यच बोलतो आहे. मी आपल्याशी प्रेमाने आणि मान ठेऊन बोलत आहे. लाज वाटणे हा कोणताही अपमानकारक शब्द नाही.

या प्रवासादरम्यान, खासदार प्रज्ञासिंह यांचा विमानाच्या क्रू मेंबरसोबत जागेवरुन वाद झाला. ठाकूर यांनी म्हटलं आहे की, जी सीट त्यांना देण्यात आली होती त्यात शेवटच्या क्षणी बदल करण्यात आला. यावर स्पाइसजेटने लिखित स्वरुपात स्पष्टीकरण देताना सांगितले की, विमानात पहिली रांग ही आपातकालिन सीटची रांग आहे. या रांगेतील सीट व्हीलचेअरवर बसणाऱ्या प्रवाशांना दिल्या जात नाहीत. ठाकूर या विमानात व्हिलचेअरवरुन दाखल झाल्या होत्या. त्यांनी एअरलाइनच्या माध्यमातून बुकींगही केलेलं नव्हतं. तसेच प्रज्ञासिंह यांच्यामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याचेही स्पाइसजेटने म्हटले आहे.

स्पाइसजेटने लिहिले की, विमानाच्या स्टाफला या गोष्टीची माहिती नव्हती की त्या व्हिलचेअरच्या प्रवाशी आहेत. क्रू मेंबरने ठाकूर यांना सुरक्षेच्या कारणास्तव २ए/बी (विनाआपातकालिन रांग) मध्ये सीट बदलून घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी सीट बदलून घेण्यास नकार दिला.