अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीची पुन्हा सुरुवात झाली आहे. बुधवारी अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलवली होती. ही बैठक तीन तास सुरु होती. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसुद्धा उपस्थित होते. तालिबानसंदर्भात आपली भूमिका काय असणार आहे हे भारताकडून लवकरच स्पष्ट केलं जाणार असल्याचं सांगितलं जात असून त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

भारताने तालिबानशी यापूर्वीच चर्चा सुरु केलीय. अमेरिकेच्या संपूर्ण सैन्यमाघारीच्या दिवशी, मंगळवारी भारताने अधिकृतपणे तालिबानशी उच्चस्तरीय चर्चा केली. भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टॅनेकझाई यांच्याशी चर्चा करून तेथील भारतीयांच्या सुरक्षेबरोबरच दहशतवादाच्या मुद्दय़ावर चिंता व्यक्त केली.

दोन दशकांनंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारताची अधिकृत भूमिका काय आहे, याबाबत उत्सुकता असताना भारताने मंगळवारी तालिबानशी चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र विभागाने दिली. तालिबानच्या विनंतीनुसार भारताच्या दोहा दूतावासात भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानचे नेते शेर मोहम्मद यांच्यात अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा, त्यांना मायदेशी आणण्याची मोहीम, भारतात येऊ इच्छिणाऱ्या अफगाणी नागरिकांची वाहतूक व्यवस्था आदींसह दहशतवादाच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. भारतविरोधी कारवाया, दहशतवादासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करू देऊ नये, असे मित्तल यांनी यावेळी नमूद केले. या सर्व मुद्दय़ांवर शेर मोहम्मद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

कृतिगटाची स्थापना

अफगाणिस्तानमधील संघर्षांच्या परिस्थतीत भारताच्या प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या कृतिगटाला केली होती. याबाबत गेल्या काही दिवसांपासून उच्चस्तरीय बैठकाही सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील हितसंबंध जपण्याच्या दृष्टीने भारत-तालिबान चर्चा ही महत्त्वाची घटना मानली जाते.

लवकरच तालिबान करणार सरकारची घोषणा…

टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानने सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा केल्याचा दावा केलाय. लवकरच तालिबान अफगाणिस्तानमधील नवीन सरकारची घोषणा करणार आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनामुल्ला समांगानी यांनी हिबतुल्लाह अखुंदजादा यांचीही नेतेपदी वर्णी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आजपासून परराष्ट्रमंत्री युरोप दौऱ्यावर…

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे गुरुवारपासून चार दिवसांच्या युरोप दौऱ्यावर जात असून ते स्लोव्हेनिया, क्रोएशिया व डेन्मार्क या देशांना भेट देणार आहेत. या देशांशी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ते प्रयत्न करतील. युरोपातील बैठकांमध्ये अफगाणिस्तानातील बदलती परिस्थिती हा चर्चेचा प्रमुख विषय आहे. ३ सप्टेंबरला ते क्रोएशियाला जाणार असून तेथे त्यांची परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रिलिक रॅडमन यांच्याशी व क्रोएशियाच्या प्रमुखांशी चर्चा होईल. ४ ते ५ सप्टेंबरला ते डेन्मार्कला जाणार असून भारत- डेन्मार्क गोलमेज परिषदेत सहभागी होतील.