केंद्र सरकारने युवक कल्याणासाठी हाती घेतलेल्या विविध योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘प्रधानमंत्री स्कीलिंग अँड एम्लॉयेबिलिटी ट्रान्सफर्मेशन थ्रू अपडेटेड आयटीआय’ (पीएम-सेतू) या उपक्रमाअंतर्गत ६२ हजार कोटींची तरतूद करून या योजना आखण्यात आल्या आहेत. या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने युवक शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकता विकासावर भर देण्यात आला आहे.

सर्वाधिक खर्च शासकीय तंत्रनिकेतन संस्थांच्या (आयटीआय) सक्षमीकरणासाठी केला जाणार आहे. त्याचा लाभ एक हजार आयटीआयना होणार असून त्यासाठी ६० हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमधील पाटणा आणि दरभंगा जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ महायुतीने हा कार्यक्रम हाती घेतल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

‘पीएम-सेतू’ योजनेत उद्योगांच्या मागणीनुसार कौशल्य प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे सक्षमीकरण, रोजगार सेवा केंद्र आणि नवकल्पना संशोधन केंद्र असे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या योजनेला जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेचे अर्थसाह्य मिळाले असून त्यामुळे शासकीय मालकीची आणि उद्योगांचे य्यवस्थापन असलेली नवीन शासकीय तंत्रनिकेतन व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ३४ राज्यांतील ४०० नवोदय आणि २०० एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या सुमारे १२०० कौशल्य प्रयोगशाळांचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.