पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (१४ फेब्रुवारी) अबू धाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं. हे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचं (BAPS) मंदिर आहे. या मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, माझं सौभाग्य आहे की, अयोध्येतील राम मंदिरापाठोपाठ आज मी अबू धाबीतल्या या भव्य मंदिराचं उद्घाटन केलं. माझे मित्र ब्रह्म स्वामी मघाशी म्हणत होते की, मोदी सर्वात मोठे पुजारी आहेत. परंतु, मला माहित नाही की, मंदिराचा पुजारी होण्याइतकी माझी पात्रता आहे का? परंतु, मला एका गोष्टीचा अभिमान आहे की, मी भारतमातेचा सर्वात मोठा पुजारी आहे. परमेश्वराने मला जितकं आयुष्य दिलंय, मला जे आणि जसं शरीर दिलं आहे त्याचा प्रत्येक कण मला केवळ भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित करायचा आहे. मी भारतमातेचा पुजारी आहे आणि १४० कोटी भारतीय माझे आराध्य आहेत. देशातला प्रत्येक नागरिक माझं आराध्य दैवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या वेदांमध्ये सांगण्यात आलं आहे की ‘एकम सत्यं विप्रा बहुदा वदंति’, याचा अर्थ असा आहे की, ईश्वर एकच आहे, एकच सत्य आहे, परंतु विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासमोर मांडतात. हे तत्वज्ञान भारताच्या मूलभूत चेतनेचा एक भाग आहे. त्यामुळेच आपण सर्वाचं स्वागत करतो. आपल्याला विविधतेतही एकात्मताच दिसते आणि हीच आपली खासियत आहे.

अबू धाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचं आज लोकार्पण पार पडलं. हे BAPS मंदिर दगडी वास्तुकलेने तयार करण्यात आलं आहे. हे आखाती प्रदेशातील सर्वांत मोठं मंदिर आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या UAE भेटीदरम्यान तिथल्या सरकारने अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला. मोदी यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि डिसेंबर २०१९ मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले. मंदिराचा अभिषेक सोहळा १४ फेब्रुवारी २०२४ रोजी पवित्र वसंत पंचमीच्या दिवशी पार पडला.

हे ही वाचा >> “भाजपाला एक दिवस मी…”, अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावरून महुआ मोइत्रांचा टोला

दरम्यान, मोदी यांच्या या यूएई दौऱ्यावेळी त्यांनी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी द्विपक्षीय बैठकी घेतली. दोन्ही नेत्यांनी देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल, विस्तारित आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झाली. मोदी हे दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट २०२४ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi says i am worshiper of mother india 140 cr indians my idol abu dhabi temple inauguration asc
First published on: 14-02-2024 at 22:41 IST