महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (१३ फेब्रुवारी) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या भाजपा कार्यालयात चव्हाणांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर अशोक चव्हाण यांनी आपण आता भाजपासाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहोत असं वक्तव्य केलं आहे. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांमधील अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ज्या-ज्या नेत्यांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्या नेत्यांची सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग आणि केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाकडून चौकशी चालू होती, अशा अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावरुन विरोधी पक्षांमधील नेते सातत्याने भाजपावर आणि दलबदलू (पक्ष बदलणाऱ्या) नेत्यांवर टीका करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यात आदर्श गृहनिर्माण संस्थेत झालेला मोठा घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यात चव्हाण यांचंही नाव पुढे आलं. परिणामी चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. या प्रकरणी अजूनही न्यायालयात खटला चालू आहे. अशातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यूपीए सरकारच्या १० वर्षांमधील कारभाराची श्वेतपत्रिका सादर केली. यामध्ये यूपीए सरकारच्या काळात देशात झालेल्या घोटाळ्यांवरून तत्कालीन सरकारचे वाभाडे काढण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी दावा केला आहे की, भारतीय जनता पार्टी आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाणांना ब्लॅकमेल करत होती. त्यामुळेच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

भाजपा नेते सातत्याने अशोक चव्हाण यांचा ‘घोटाळेबाज’, ‘लीडर नव्हे डीलर’, ‘शहिदांचा अपमान करणारा’, अशा शब्दांत टीका करत होते. भाजपाने चव्हाण यांच्याविरोधात मोठं आंदोलनही केलं होतं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड येथे येऊन अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत चव्हाण यांच्यासह काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तेच अशोक चव्हाण आता भाजपात गेले आहेत. यावरून काँग्रेससह विरोधी पक्ष भाजपावर टीका करत आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबत राष्ट्रीय पातळीवरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोइत्रा यांनी अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख टाळत भाजपात चालू असलेल्या पक्षप्रवेशांवरून भाजपाला टोला लगावला आहे. मोइत्रा यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मला वाटलेलं, रामलल्ला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या (भाजपा) ४०० जागांची काळजी घेतील. तरीसुद्धा ज्या नेत्याला ते नेहमी भ्रष्ट म्हणून धिक्कारत होते, त्याच नेत्याला भाजपाने अत्यंत हताशपणे फोडलं आणि आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. हे सगळं याच गतीने चालत राहिले तर एक दिवस त्यांना मी हवी असेन.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahua moitra says bjp will soon want me in their party after ashok chavan asc
First published on: 14-02-2024 at 14:08 IST