भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांच्या मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर त्या आता भाजपाच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. नुकतेच त्यांनी तेलंगणामधील हैदराबाद लोकसभेत भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी ओवेसी बंधूवर जोरदार टीका केली. महबुबनगर येथे एका जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांनी आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या २०१३ सालातील विधानाचा हवाला देऊन टीका केली. नवनीत राणा यांचाही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

माधवी लता यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत नवनीत राणा यांनी हैदराबादचे विद्यमान खासदार आणि एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला. ओवेसी बंधूंचे नाव न घेता त्या म्हणाल्या, “छोट्या भावाने १५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला करण्यास सांगितले होते. मी आज त्यांना सांगू इच्छिते, छोट्या तुला १५ मिनिटे लागत होती. पण आम्हाला फक्त १५ सेकंद लागणार आहेत. जर १५ सेकंदासाठी पोलिसांना बाजूला केले, तर छोट्या भावाला समजणारही नाही, कुठून आले आणि कुठे गेले.”

हिंदुत्ववादी महिला असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का?

नवनीत राणा यांनी या विधानाचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरही शेअर केला आहे.

कोण आहेत माधवी लता?

असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात हैदराबाद लोकसभेतून भाजपाने हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. त्या हैदराबादमधील विरंची मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अध्यक्ष आहेत. याशिवाय त्या सामाजिक कार्यातही सहभागी असतात. सोशल मीडियावर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असतो. हैदराबादचे ज्येष्ठ व्हीएचपी नेते भगवंत राव पवार यांना डावलून यंदा भाजपाने लता यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारशैलीने अनेकांची मने जिंकली आहेत; तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारी पोस्ट टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. मुस्लीम महिलांसाठीही लता यांनी अनेक कामे केली आहेत. मुस्लीम महिलांविरुद्ध होणार्‍या भेदभावाबद्दल बोलणार्‍या लता म्हणतात की, पसमंदा मुस्लिम महिलांचा मला पाठिंबा आहे.

हैदराबादवर ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व

ओवेसी कुटुंबाची हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर पकड आहे. १९८४ पासून एआयएमआयएमने या जागेवर विजय मिळविला आहे. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवेसी पहिल्यांदा येथून खासदार झाले. त्यानंतर आणखी पाच वेळा जनतेने त्यांना निवडून दिले. २००४ मध्ये ओवेसी यांनी पदभार स्वीकारला आणि आता सलग पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून येणे हे त्यांचे लक्ष्य आहे. २०१९ च्या मध्ये त्यांनी भाजपाच्या भगवंतराव पवार यांचा २.८२ लाख मतांनी पराभव केला होता.