scorecardresearch

‘नोटाबंदी हा मोदी सरकारने घेतलेला धाडसी निर्णय’

यशवंत सिन्हा यांच्या मताशी सहमत नसल्याचे योगी आदित्यनाथ यांचे उत्तर

yogi adityanath bjp up cm
योगी आदित्यनाथ (संग्रहित छायाचित्र)

नोटाबंदी हा निर्णय मोदी सरकारने घेतलेला धाडसी निर्णय आहे. यामुळे देशातील भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत झाली. माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या मताशी मी सहमत नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. यशवंत सिन्हा यांच्या टीकेला काही अर्थ नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली.

मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याचे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यास सुरूवात झाली. देशासह जगभरात जीएसटीचा निर्णय घेतला गेल्यामुळे भाजप सरकारचे कौतुक झाले. अशावेळी यशवंत सिन्हा यांनी जी भूमिका मांडली , त्यात अर्थ नसल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या आणि जीएसटीच्या निर्णयांवर टीका केली होती. या दोन्ही निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली अशी टीका सिन्हा यांनी केली होती. या टीकेला उत्तर देत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर दिले.

‘४० महिने सत्तेत आहात तरीही अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे, याचे खापर आधीच्या सरकारवर फोडू नका’ असे म्हणत यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर टीका केली. काँग्रेसच्या काळात धोरण लकव्याची अवस्था होती. मोदी सरकार सत्तेत आल्यावर ही अवस्था बदलेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही, उलट रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत आणि सकल राष्ट्रीय उत्पादन घटले आहे त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले असेही सिन्हा यांनी म्हटले. मात्र यशवंत सिन्हा यांच्या कोणत्याही मताशी मी सहमत नाही. मोदी सरकारच्या काळात अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठीच कठोर निर्णय घेण्यात आले असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2017 at 17:31 IST