PM Modi at Global Fintech Fest: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) या खासगी कार्यक्रमासाठी जियो वर्ल्ड कनव्हेन्शन सेंटर येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी भारताने फिनटेक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. भारतीय बँकिंग व्यवस्था आता नेटबँकिंग आणि ॲपच्या माध्यमातून २४ तास सुरू असते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ऑगस्ट महिन्यात अनेक सण असतात, नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली. भारतात जसा सणांचा उत्साह आहे, तसाच अर्थव्यवस्था आणि बाजारातही उत्साह दिसत असल्याचेही ते म्हणाले.

भारतात फिनटेकमुळे बँकिंग व्यवस्थेत आमुलाग्र बदल झाल्याचे सांगताना पतंप्रधान मोदी म्हणाले, “एकेकाळी लोक संसदेत मला सांगायचे भारतात बँकाच्या पुरेशा शाखा नाहीत. गावात बँका, इंटरनेट सुविधा नाही. तर मग फिनटेक क्रांती कशी होणार? पण एका दशकात ब्रॉडबँड इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ६० दशलक्षहून ९४० दशलक्षापर्यंत पोहोचली. करोना महामारीदरम्यानही भारतात बँकिंग सुविधा मंदावली नाही. क्युआर कोड आणि युपीआयमुळे आता बँकेचे व्यवहार २४ तास सुरू असतात.”

हे वाचा >> Modi in Mumbai: पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला आंदोलनाचे ग्रहण; वाढवणमधील मच्छिमार, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

‘करन्सी ते क्युआर कोड’, भारतात फिनटेक क्रांती

एक काळ असा होता जेव्हा विदेशातील लोक भारतात आल्यावर सांस्कृतिक विविधता पाहून हैराण होत असत. पण आता जेव्हा ते भारतात येतात तेव्हा फिनटेक विविधता पाहूनही हैराण होतात. विमानतळावर उतरल्यापासून ते स्ट्रीट शॉपिंग करेपर्यंत सर्व ठिकाणी फिनटेकचा बोलबाला दिसून येतो. ‘करन्सी ते क्युआर कोड’, अशी फिनटेक क्रांती भारताने केली, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टच्या कार्यक्रमात केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एआयचा गैरवापर रोखण्यासाठी प्रयत्न करणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनात एंजल टॅक्स रद्द करण्यात आला, याचाही उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. ते म्हणाले, फिनटेक क्षेत्राला मदत करण्यासाठी आम्ही धोरणात्मक पातळीवर हा निर्णय घेऊन एंजल टॅक्स रद्द केला. आता डिजिटल व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी सायबर घोटाळ्यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न करू. तसेच जगभरात एआयचा गैरवापर होत आहे. हा दुरूपयोग रोखण्यासाठी जागतिक स्तरावर नियमावली तयार करण्याचे आवाहन मी केले आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.