पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले होते. यानंतर पीडित महिलांनी एका तृणमूल काँग्रेस नेत्याच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर हे प्रकरण देशभर गाजले. यानंतर भाजपाने त्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई करण्यासाठी अनेक मोर्चे काढले होते. यानंतर या प्रकरणाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा आवाज रेखा पात्रा यांनी उठवला होता. यानंतर रेखा पात्रा यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेखा पात्रा यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला आहे.
भाजपाने बसीरहाट मतदारसंघातून रेखा पात्रा यांना उमेदवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेखा पात्रा यांना मंगळवारी (२६ मार्च) फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत निवडणुकीच्या तयारीविषयी काही प्रश्न विचारले. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळते का? असे विचारत रेखा पात्रा यांचा ‘शक्ती स्वरूप’ असा उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशखाली या गावाला भेटदेखील दिली होती.
हेही वाचा : “गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, आम्ही..”; संजय राऊत यांची महायुतीवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“सर्वात आधी तुमची (रेखा पात्रा यांची) खुशाली जाणून घ्यायची आहे. आता तुम्ही मोठी जबाबदारी उचलणार आहात. तुमच्या सर्व बहिणींचा आशिर्वाद आहेच. रेखाजी तुमचा निरोप मिळाला होता. तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर काय वाटले? आता काही अडचण आहे का? सध्या कोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागतो? याबद्दल सांगा. तुम्ही ‘शक्ती स्वरूप’ आहात. तुम्ही एवढ्या धाडसी आहात, याची तुम्हाला कल्पना होती का? आता मी खात्री देतो, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. तुमच्याबरोबर बोलून आनंद वाटला”, असा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेखा पात्रा यांच्याशी साधला.
रेखा पात्रा काय म्हणाल्या?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोनवर संवाद साधताना रेखा पात्रा म्हणाल्या, “मला खूप छान वाटले. तुमचा हात आमच्या डोक्यावर आहे. तुम्ही आमच्यासाठी देवस्वरूप आहात. आमच्याबरोबर झालेला अन्याय दुर्दैवी असून या संदेशखाली प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी. संदेशखाली येथील सर्व महिलांचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे मी आवाज उठवू शकले. यापुढेही असेच काम करत राहील”, असे रेखा पात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणाल्या.
संदेशखाली प्रकरण नेमके काय आहे?
पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील संदेशखाली या गावात काही महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याबरोबरच तेथील काही गरिबांची जमीन बळकावण्यात आल्याचा आरोप झाला होता. यावरून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असेल्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये संघर्ष सुरू आहे. या प्रकरणातील ज्या व्यक्तीवर आरोप आहेत, तो व्यक्ती तृणमूल काँग्रेसचा नेता आहे. या प्रकरणात काही जणांना अटक झाली असून पुढील तपास चौकशी सुरू आहे.