दोषी लोकप्रतिनिधींच्या बचावार्थ केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकुमाबाबत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभेत ताशेरे का ओढले, याचा मी शोध घेईन, असे सांगतानाच राहुल यांच्याशी चर्चा करून ‘मतपरिवर्तन’ केले जाईल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी स्पष्ट केले. आपण सहजासहजी खचून जात नाही असे सांगत या प्रकरणी राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.राहुल गांधी यांनी सरकारचा वटहुकुम म्हणजे मूर्खपणा असल्याचे वक्तव्य केले होते. सदर वटहुकुमाबाबत यापूर्वीही दोन वेळा मंत्रिमंडळाशी चर्चा केली होतीच शिवाय काँग्रेसच्या कोअर समितीशीही विचारविनीमय झाला होता. त्यामुळेच राहुल गांधी यांनी अशी भूमिका का घेतली हे मला समजून घ्यायचे आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केली. याबाबत आपण राहुल यांच्याशी बुधवारी चर्चा करणार आहोत असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. या वक्तव्याबाबत मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊन त्यांचेही मत आजमावणार असल्याचे ते म्हणाले.
स्वतंत्र तेलंगणास प्राधान्य
स्वतंत्र तेलंगणा निर्मितीबाबत घेतल्या गेलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीस आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आपल्या विशेष विमानात पत्रकारांशी संवाद साधताना, आपण या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सद्यस्थितीविषयी चौकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
.. तरच शांतता शक्य
भारताचे पाकिस्तानसह असलेले संबंध सौहार्दतेचे राहावेत यासाठी सर्वप्रथम नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले. यासाठीचे पहिले पाऊल म्हणून उभय राष्ट्रांचे लष्करी मोहिमांचे महासंचालक नियमितपणे भेट घेणार असून त्यांच्यात चर्चा करण्यावर दोन्ही राष्ट्रांचे एकमत झाल्याचे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानी पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत शस्त्रसंधीचा सन्मान राखण्याबद्दल बजावल्याचे त्यांनी नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2013 रोजी प्रकाशित
राहुल असं का बोलले, याचा शोध घेऊ!
दोषी लोकप्रतिनिधींच्या बचावार्थ केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकुमाबाबत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभेत ताशेरे का ओढले,

First published on: 02-10-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm rules out resignation says will talk to rahul gandhi on ordinance issue