पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) महिला अधिकारी श्रद्धा गुप्ता यांनी शनिवारी अयोध्येत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रद्धा गुप्ता यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी आशिष तिवारीसह तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रद्धा गुप्ता यांनी शनिवारी भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला आयपीएस अधिकारी आशिष तिवारी, हेड कॉन्स्टेबल अनिल रावत आणि विवेक गुप्ता जबाबदार असल्याचे श्रद्धाने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. श्रद्धा गेल्या पाच वर्षांपासून अयोध्येतील पंजाब नॅशनल बँकेत काम करत होती.

श्रद्धा गुप्ता यांचा भाऊ रितेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “श्रद्धाला रात्री घरच्यांनी फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. ती झोपली असावी, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र सकाळी १०-१२ वेळा फोन करूनही श्रद्धाने फोन उचलला नाही, तेव्हा घरचे लोक घाबरले आणि त्यांनी घरमालकाला फोन केला. घरमालकाने घरात पाहिले असता श्रद्धाने गळफास लावून घेतल्याचं समोर आलं. तसेच श्रद्धाने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहीली होती. या मध्ये तिने आत्महत्येसाठी ज्या तीन जणांना जबाबदार धरले आहे. त्यापैकी आयपीएस आशिष तिवारी हे काही वर्षांपूर्वी अयोध्येत एसएसपी होते आणि विवेक गुप्ता नावाच्या व्यक्तीसोबत श्रद्धाचे लग्न ठरले होते. पण विवेकची वागणूक चांगली नसल्यामुळे श्रद्धाने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रद्धाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, श्रद्धाने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे संतापलेला विवेक श्रद्धाला खूप त्रास देत होता. तो त्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धाला फोन करायला लावायचा आणि त्रास देत होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीएस आशिष तिवारीसह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.