पीटीआय, नवी दिल्ली : करोना प्रादुर्भावात वाढ होण्याच्या कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी व त्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी मंगळवारी देशभरातील अनेक रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) करण्यात आले. यासाठी मनुष्यबळ व साधनांची सज्जता ठेवणे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंडाविया यांनी मंगळवारी केंद्र सरकार संचालित सफदरजंग रुग्णालयाने आयोजित केलेल्या सराव प्रात्यक्षिकांची पाहणी केली. चीनसह काही देशांत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कोविड रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेण्याची सूचना केली आहे.

या प्रात्यक्षिकांत संबंधित रुग्णालयांत खाटांची उपलब्धता, वैद्यकीय कर्मचारीसंख्या, संदर्भ संसाधने, चाचणी क्षमता, वैद्यकीय उपकरणे आणि पुरवठा, टेलि मेडिसिन (दूरसंचार आणि डिजिटल माध्यमांच्या मदतीने वैद्यकीय सेवा) सेवा व प्राणवायू (वैद्यकीय ऑक्सिजन) उपलब्धता यासह इतर पैलूंचा आढावा घेतला जात आहे. मांडविया म्हणाले की, रुग्णालयांची तयारी तपासण्यासाठी हा उपक्रम गरजेचा होता. जगभर करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारतातही हा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे वैद्यकीय उपकरणे, कार्यपद्धती व मनुष्यबळाच्या दृष्टीने संपूर्ण पायाभूत सुविधा सज्ज असणे आवश्यक आहे. रुग्णालयांत सज्जता महत्त्वाची असून, त्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. राज्यांचे आरोग्य मंत्री आपापल्या भागातील प्रात्यक्षिकांचा आढावा घेत आहेत. सर्वानी कोविड प्रतिबंधक खबरदारीच्या उपाययोजना, सुसंगत वर्तन, अनधिकृत माहितीची प्रसार, अफवा पसरवणे टाळावे व सज्ज-सतर्क रहावे, असे आवाहनही मंडाविया यांनी नागरिकांना केले.

दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय व इतर सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रात्यक्षिके घेण्यात आली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री मनीष सिसोदिया दुपारी जयप्रकाश नारायण रुग्णालयात आले होते. कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी दिल्ली सरकार सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Coronavirus: “करोनाला गांभीर्याने न घेण्याची सध्याची…”; राजेश टोपेंचा सल्ला, विद्यमान आरोग्यमंत्र्यांसंदर्भातही नोंदवली प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशमध्ये, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी लखनौमधील एका रुग्णालयाला भेट दिली व तेथील तयारी तपासली. उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव व आग्रा जिल्ह्यात नुकतेच विदेशातून परतलेल्या दोन जण करोनाबाधित आढळले आहेत. मध्य प्रदेशातील सर्व सरकारी वैद्यकीय संस्थांत हा उपक्रम राबवण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले, की मध्य प्रदेशातील करोनासंदर्भातील स्थिती नियंत्रणात आहे. अलीकडे राज्यात एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

पश्चिम बंगालमधील रुग्णालयांनी मंगळवारी ही प्रात्यक्षिके घेतली. कोलकत्त्यातील एम. आर. बांगर रुग्णालय, संसर्गजन्य रोग आणि बेळघाट सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, कार मेडिकल कॉलेज आणि शंभूनाथ पंडित रुग्णालयासह विविध रुग्णालयांत प्रात्यक्षिके घेण्यात आली. कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले, की राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यांतील रुग्णालयांत सराव प्रात्यक्षिके सुरू आहेत.  केरळमध्येही कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयासह इतर वैद्यकीय संस्थांतील तयारीचा आढावा घेण्यात आला. तमिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी  चेन्नईतील  सरकारी रुग्णालयात  पाहणी केली.

देशात दिवसभरात नवे १५७ रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मंगळवारी भारतात करोनाचे १५७ नवीन रुग्ण आढळले, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या किंचित घटली असून, तीन हजार ४२१ झाली आहे.

राज्यात करोनाची सक्रिय रुग्णसंख्या कमी; ९८ टक्के रुग्ण ठणठणीत

नाकाद्वारे घ्यायची लस खासगी क्षेत्रात ८०० रुपयांना

 ‘भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड’तर्फे निर्मित नाकावाटे द्यावयाची ‘इनकोव्हॅक’ ही करोना प्रतिबंधक लस वस्तू व सेवा कर (जीएसटी) वगळून खासगी बाजारपेठेत ८०० रुपयांना व सरकारी पुरवठादारांसाठी ३२५ रुपयांना उपलब्ध असेल. ही लस ‘कोविन’ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २०२३ मध्ये जानेवारीच्या चौथ्या आठवडय़ात ही लस सर्वत्र उपलब्ध केली जाईल, असे ‘भारत बायोटेक’कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे, की प्राथमिक दोन मात्रांप्रमाणेच वर्धक मात्रा म्हणून ‘इनकोव्हॅक’ या पहिल्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीस परवानगी मिळाली आहे. डिसेंबरच्या प्रारंभी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडून या लस उत्पादकांना परवानगी मिळाली. ‘इनकोव्हॅक’च्या दोन मात्रांच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आल्या. या चाचण्या भारतात १४ ठिकाणी ३१०० जणांवर करून त्यांची रोगप्रतिकारक क्षमता तपासण्यात आली. तसेच वर्धक मात्रेसाठी ८७५ जणांवर चाचण्या करण्यात आल्या होत्या.

‘भारत बायोटेक’चे कार्यकारी अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी सांगितले, की आम्ही ‘कोव्हॅक्सिन’ व ‘इनकोव्हॅक’ या लशींची निर्मिती भिन्न पद्धतीने केली आहे. त्यांची कार्यप्रणालीही वेगळी असेल. नाकावाटे द्यावयाची लशीचे जलद उत्पादन करता येते. त्याचे प्रमाणही वाढवता येते. त्यामुळे महासाथीसारख्या सार्वजनिक आरोग्यातील आणीबाणीच्या स्थितीत सुलभ व वेदनारहित व्यापक लसीकरण करण्यास मदत होते. ‘इनकोव्हॅक’ची निर्मिती वॉशिंग्टन विद्यापीठाच्या सहाय्याने करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Practicing corona treatment across the country hospitals in various states are ready ysh
First published on: 28-12-2022 at 01:09 IST