अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (स्थानिक वेळेनुसार) वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत केले. वेस्ट विंग लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मनपूर्वक आलिंगन दिले. त्यांच्या या अलिंगनाची चर्चा सुरू असतानाच एक व्हिडिओही व्हायरल होतोय. त्यात डोनाल्ड ट्रम्प स्वतः नरेंद्र मोदी यांना बसण्यासाठी खुर्ची देत असल्याचं दिसतंय.
डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांबाबत व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली. यावेळी या चर्चेला सुरुवात होण्याआधी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी आदरपूर्वक नरेंद्र मोदी यांना बसायला खुर्ची दिली. त्यांच्या या कृतीमुळे जगभरात चर्चा होऊ लागली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर काही वेळातच, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यासह भारतीय शिष्टमंडळ देखील व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. भेटीपूर्वी, परिसरात भारतीय झेंडे लावण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोदींनी दिली भेट
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर अमेरिकेला भेट देणाऱ्या पंतप्रधान मोदी हे पहिल्या जागतिक नेत्यांपैकी एक आहेत आणि नवीन प्रशासनाने पदभार स्वीकारल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात घनिष्ठ संपर्क आहे, नोव्हेंबर २०२४ पासून त्यांनी दोनदा फोनवर चर्चा केली आहे.
VIDEO | PM Modi (@narendramodi) meets US President Donald Trump (@realDonaldTrump) at White House in Washington, DC.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos- https://t.co/dv5TRAShcC) pic.twitter.com/omSabd7aQVThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2025
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मोदींचे विशेष दूत म्हणून ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थिती लावली, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली आणि जानेवारी २०२५ मध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. ट्रम्प यांना भेटण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्यासह प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. यामुळे द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि प्रमुख जागतिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या चर्चेचा पाया रचला गेला.