नागपूर : पूर्व विदर्भाला सुजलाम-सुफलाम करणारा गोसेखुर्द सिंचन प्रकल्प काँग्रेसमुळे रखडला. केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारने त्याला निधी दिला, असा आरोप करत ‘इंडिया’ आघाडी ही विकास विरोधी आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. महाराष्ट्रातून या आघाडीचा एकही उमेदवार निवडून देऊ नका, असे आवाहन त्यांनी कन्हान येथे झालेल्या जाहीर सभेत केले. 

पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघासाठी रामटेक मतदारसंघात बुधवारी पंतप्रधान मोदी यांची राज्यातील दुसरी प्रचारसभा झाली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीयमंत्री व नागपूचे भाजप उमेदवार नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. नेहमीप्रमाणे मोदी यांनी या सभेतही ‘इंडिया’ आघाडी विशेषत: काँग्रेस कशी विकास विरोधी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. येत्या १९ एप्रिलला तुम्हाला फक्त एक खासदार निवडायचा नाही, तर पुढच्या एक हजार वर्षांचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. आपल्याला विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचं आहे, असे मोदी म्हणाले. आघाडी विकास विरोधी असल्याचे सांगताना त्यांनी भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे उदाहरण दिले. काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष हा प्रकल्प निधी अभावी रखडला होता. केंद्रात व महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकल्पासाठी घसघशीत मदत केली. त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला, असे मोदी म्हणाले. केंद्र सरकारकडून मागासवर्गीय, इतर मागासवर्गीयांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देताना सर्वसामान्य जनतेसाठी आपला संघर्ष सुरूच राहील, असे ते म्हणाले. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण संविधान लागू का केले नाही, सीएला आघाडीचा विरोध का, असे अनेक प्रश्न करीत ‘इंडिया’ आघाडी ताकदवान झाले तर देशाचे तुकडे-तुकडे करतील असा आरोप मोदी यांनी केला. 

हेही वाचा >>>मोठी बातमी! भाजपाचे पुन्हा धक्कातंत्र; चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, ‘या’ नव्या चेहऱ्यांना दिली संधी

‘संविधान संकटात ही अफवा’

मोदी पुन्हा सरकारमध्ये आले तर लोकशाही आणि संविधान संकटात येईल, अशी अफवा ‘इंडिया’ आघाडी पसरवत आहे.. मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत हा प्रकार केला जातो. यांच्याकडे नवी कल्पनाही नाही. आणीबाणीच्या वेळी लोकशाही धोक्यात आली नव्हती का,  असा सवाल मोदी यांनी केला.

गडकरींसाठी मोदींची पहिलीच सभा

नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी नागपूर जिल्ह्यात प्रथमच प्रचारसभा घेतली. २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुका गडकरी निवडून आले होते. मात्र तेव्हा त्यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा झाली नव्हती. बुधवारची सभाही नागपूरमध्ये नसली, तरी शहरालगतच रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे झाली. मात्र नागपूर, रामटेक आणि गोंदिया-भंडारा या तीन मतदारसंघासाठी ही सभा असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते.

रामटेकला श्रीरामांचे पाय लागले आहेत. यावेळी अयोध्येत आमचे रामलल्ला भव्य मंदिरात दर्शन देतील. ५०० वर्षांनी हा क्षण येत आहे. पण प्राणप्रतिष्ठानच्या वेळी इंडिया आघाडीने निमंत्रण स्वीकारलं नाही. हे लोक हिंदू धर्माच्या शक्तीला समाप्त करु इच्छित आहेत. अशा ‘इंडिया’ आघाडीला महाराष्ट्रात एक तरी जागा  जिंकू देऊ नका. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान