पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. आईच्या निधानानंतर मोदी आज सकाळीच गांधीनगर येथील त्यांच्या घरी पोहचले होते. यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आईच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि खांदा अंत्यसंस्कार पार पडला. यानंतर पंतप्रधान मोदींनी या दु:खात स्वत:ला सावरत तासाभरातच पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली.

हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला. आईच्या निधनामुळे मोदींनी पश्चिम बंगालचा दौरा पुढे ढकलला, मात्र त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात भाग घेतला.

नक्की पाहा – PHOTOS : पंतप्रधान मोदींचा रुग्णवाहिकेतून प्रवास, गांधीनगरमधील घराबाहेरची गर्दी अन्…; हिराबेन मोदींना अखेरचा निरोप देतानाची क्षणचित्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकातामधील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ती देशाला समर्पित केली. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.

पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडा दाखवत असताना आणि हावडा स्टेशनवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित असताना, जमलेल्या नागरिकांनी जय श्रीराम अशा घोषणाही दिल्याचे दिसून आले.

हेही वाचा – मोदींना मातृशोक : अमित शाह, सुप्रिया सुळे, राज्यपाल कोश्यारी हळहळले; आदित्यनाथ म्हणाले, “आईच्या निधानामुळे मुलाला…”

ममता बॅनर्जींनी शोक व्यक्त केला –

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधानावर शोक व्यक्त करताना म्हणाल्या, “पंतप्रधान मोदीजी आज आपल्यासाठी अत्यंत दुख:द दिवस आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की हे दु:ख सहन करण्याची तुम्हाला शक्ती लाभो. मी आपणास विनंती करेन की हा कार्यक्रम आपण छोट्या स्वरुपातच करावा, कारण तुम्ही आता तुमच्या आईचे अंत्यसंस्कार करत आहात.”