पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात कॅनडामध्ये होणाऱ्या ‘जी-७’ शिखर परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता नाही असे या प्रकरणाची माहिती असलेल्यांनी सोमवारी सांगितले. पंतप्रधान मोदी आतापर्यंत पाच वेळा ‘जी-७’ शिखर परिषदेला हजर राहिले आहेत. यापूर्वी ते गेल्या वर्षी जूनमध्ये इटलीत, २०२३मध्ये जपानमध्ये आणि २०२२मध्ये जर्मनीतील जी-७ शिखर परिषदेला हजर राहण्यासाठी गेले होते.
कॅनडामध्ये १५ ते १७ जून यादरम्यान ही शिखर परिषद होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाने अद्याप भारताला परिषदेचे आमंत्रण पाठवलेले नाही. मात्र, या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तींनी सांगितले की पंतप्रधान मोदी तसेही कॅनडाला जाणार नव्हते. गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर परिषदेला हजर राहण्यासाठी बरीच तयारी करावी लागणार होती, तशी ती झालेली नाही. या शिखर परिषदेत युद्धांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आव्हानांवर चर्चा होणार आहे.
कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी २०२३मध्ये भारतावर फुटीरवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध दुरावले होते. विद्यामान पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारण्यावर भर देत असल्याचे जाहीर केले आहे