पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी त्यांचे सिंगापूरचे समकक्ष लॉरेन्स वोंग यांच्याबरोबर चर्चा करून व्यापक धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्यावर भर दिला. भारत-सिंगापूर संबंध राजनैतिकतेच्या पलीकडे आहेत, असा विश्वास मोदी यांनी या वेळी व्यक्त केला. जगातील सध्याच्या भू-राजकीय अशांततेतून मार्ग काढण्यासाठी संबंध मजबूत करण्याची गरज दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केली.
भारत दौऱ्यावर आलेले वोंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम आणि इतर डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले. दहशतवादाबाबत आम्हाला समान चिंता आहेत, असे मोदी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हणाले. ‘‘दहशतवादाविरुद्ध लढणे हे मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व देशांचे कर्तव्य आहे. दोन्ही देशांमधील भागीदारी सामायिक मूल्यांमध्ये रुजलेली आहे आणि ती परस्पर हितसंबंध आणि शांतता आणि समृद्धीसाठी समान दृष्टिकोनाद्वारे निर्देशित आहे,’’ असे मोदी यांनी या वेळी सांगितले.
दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सिंगापूरच्या नाणेनिधी प्राधिकरणामधील डिजिटल मालमत्ता नवोपक्रमावरील करार हा त्यापैकी एक आहे.