काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून पक्षातर्फे नागपुरात आज जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. मात्र त्याआधीच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या अडचणी वाढविणारी बातमी हाती येत आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने पहिल्यांदाच प्रियांका गांधी यांचे नाव आरोपपत्रात दाखल केले आहे. हरियाणातील फरिदाबाद येथे शेतजमीन विकत घेतल्याचे सदर प्रकरण असून त्यात प्रियांका गांधी यांचीही भूमिका असल्याचे आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र हे नाव आरोपी म्हणून नसून जमीन खरेदीसंदर्भात त्यांचा सहभाग असल्याबाबत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ईडीच्या आरोपपत्रात प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे नाव पहिल्यांदाच घेतले गेले आहे. ईडीच्या आरोपत्रानुसार वाड्रा दाम्पत्यांनी दिल्लीतील बांधकाम क्षेत्रातील एजंटच्या माध्यमातून हरियाणाील फरिदाबाद येथे जमीन विकत घेतली होती. हीच जमीन एजंटने अनिवासी भारतीय आणि व्यावसायिक सीसी थम्पी यांनाही विकली होती. या प्रकरणात सीसी थम्पी, सुमीत चढ्ढा आणि संजय भंडारी अशा इतर लोकांची नावे आहेत. त्यापैकी संजय भंडारी यांच्यावर मनी लॉड्रिंग आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, २००५ साली फरिदाबादमधील अमीपूर गावात एच. एल. पाहवा प्रॉपर्टी डिलरकडून रॉबर्ट वाड्रा यांनी ४०.०८ एकर जमीन विकत घेतली होती. ही जमीन त्यांनी २०१० साली पाहवा याला पुन्हा विकली. याच पद्धतीने अमीपूर गावात २००६ साली प्रियांका गांधी यांच्या नावेही जमीन विकत घेतली होती. जी फेब्रुवारी २०१० साली पुन्हा पाहवा याला विकण्यात आली. ईडीमधील सूत्रांच्या माहितीनुसार, एजंट पाहवा आणि व्यावसायिक थम्पी यांच्यात जवळचे संबंध असून थम्पी यांनाही याच एजंटने अमीपूर गावात जमीन मिळवून दिली होती. दरम्यान थम्पी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यातही जवळचे संबंध असून दोघांनी व्यापारासह अनेक कामं केली असल्याचे सांगितलं जातं. थम्पीला ईडीने जानेवारी २०२० मध्ये अटक केली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.

ईडीचे प्रकरण शस्त्रास्त्रांचा व्यापारी संजय भंडारी याच्याशी निगडित आहे. संजय भंडारी याच्यावर मनी लॉड्रिंग आणि परदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. २०१६ साली संजय भंडारी याने अटक होण्याच्या भीतीने भारतातून पळ काढला. सूत्रांच्या माहितीनुसार थम्पी आणि ब्रिटिश नागरिक सुमित चड्ढा यांनी संजय भंडारी याचा काळा पैसा लपविण्यासाठी मदत केली असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. संजय भंडारी यांच्याकडे अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता आहेत. त्यापैकी लंडन येथे १२ ब्रायनस्टोन स्क्वेअर आणि ६ ग्रॉसव्हेनर हिल कोर्ट या मालमत्तांचा समावेश होतो.

हे वाचा >> ईडीच्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रांचं नाव; ‘या’ प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता!

रॉबर्ट वाड्रांचा संबंध कसा?

“थम्पी हे रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय आहेत. वाड्रा यांनी चढ्ढाकरवी लंडनमधल्या दोन मालमत्तांपैकी १२ ब्रायनस्टोन स्क्वेअर या मालमत्तेचं फक्त नुतनीकरण केलं नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्यही केलं आहे. त्याशिवाय वाड्रा आणि थम्पी यांनी फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली असून एकमेकांशी त्यांचे आर्थिक व्यवहारही आहेत”, अशी माहिती ईडीनं दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आली होती.