उत्तर प्रदेशात ४ ठिकाणी लवकरच ‘वैदिक रंगा’चे उत्पादन करण्यात येईल, अशी माहिती खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (केव्हीआयसी) एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.

 वैदिक रंगाचे (पेंट) उत्पादन करण्यासाठी बाराबंकी, वाराणसी, बलिया व मेरठ येथे कारखाने उभारले जातील, असे केव्हीआयसीचे वाराणसी येथील संचालक डी. एस. भाटी यांनी पीटीआयला सांगितले.

 हा  रंग नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा आहे, कारण त्यात कुठल्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य नाही, तसेच तो ‘नैसर्गिक’ स्रोतांपासून तयार केला जातो आणि इतर रंगांइतकाच टिकाऊ असतो. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर रंगांपेक्षा त्याची किंमत कमी आहे, असेही वाराणसी प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी व येथील ‘माघ मेळय़ात’ सहभागी होण्यासाठी आलेले भाटी म्हणाले.

सध्या पांढरा व डिस्टेंपर अशा दोन प्रकारांतील वैदिक रंग पथदर्शी प्रकल्पाखाली जयपूरच्या सांगानेर येथे तयार केला जात असल्याचेही भाटी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 लवकरच हा पेंट इतर रंगांमध्येही आणण्याचा आयोग प्रयत्न करत असून, त्यांच्या आराखडय़ावर संशोधन सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.