लोककलावंतांसह पथनाटय़ांनाही उत्तम मानधन

निवडणुकीतील रोजगार

(संग्रहित छायाचित्र)

शिवाजी खांडेकर

निवडणुकीतील रोजगार

पुणे जिल्ह्य़ातील शिरूर आणि मावळ मतदारसंघाची मतदानाची तारीख जवळ आल्यामुळे विविध माध्यमांचा वापर करून उमेदवार मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांसह, पारंपरिक कलाकारांनाही प्रचाराचे काम देण्यात आले असून या माध्यमातून कलाकारांना चांगला रोजगार मिळत आहे. वासुदेव, शाहीर, पथनाटय़ कलाकार, गायक, वादक आदींना निवडणुकीच्या माध्यमातून गेल्या पंधरवडय़ापासून रोजगार मिळाला आहे.

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे प्रत्येकी सहा मतदारसंघ येतात. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. परिणामी उमेदवार मतदारसंघाचा दौरा करताना सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

काही उमेदवारांनी पहाटेच्या वेळी ‘दान पावलं’ म्हणत दारोदारी फिरणाऱ्या वासुदेवांना प्रचारासाठी नियुक्त केले आहे. पाच ते आठ जणांचा वासुदेवांचा गट रोज त्यांना सांगण्यात आलेल्या ठराविक भागात फिरून ज्यांनी नियुक्त केले आहे त्या उमेदवाराचा प्रचार करतो. या कामासाठी त्यांना दिवसाकाठी प्रत्येकी सातशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत बिदागी मिळते. शिवाय भोजनाची व्यवस्थाही उमेदवाराकडून केली जाते. निवडणुकीमुळे वासुदेवांना बारा-पंधरा दिवसांचे हमखास काम मिळाले आहे.

मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी पथनाटय़ांचेही सादरीकरण  प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये केले जात आहे. पथनाटय़ांचे संयोजन महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या ठराविक भागात मतदान करा या विषयावर मतदारांमध्ये जागृती केली जात आहे.

पथनाटय़ाच्या एका पथकामध्ये सहा ते सात कलाकार असतात. त्यातील प्रत्येक कलाकाराला प्रतिदिनी एक हजार रुपये मानधन मिळत आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांसाठी उघडय़ा मोटारीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या मोटारीबरोबर व्यवस्थापक, मोटारचालकही असतो. त्यांनाही या माध्यमातून रोजगार मिळत आहे. मतदारसंघातील उमेदवारांकडूनही पथनाटय़ कलाकारांचा वापर केला जात आहे. प्रचार करण्यासाठी पथनाटय़ कलाकारांना उमेदवारांच्या प्रचाराच्या मुद्दय़ाची संहिता लिहून दिली जाते. त्यानुसार कलाकार पथनाटय़ाद्वारे कला सादर करून उमेदवारांचे गुणगान करत प्रचार करतात. त्यांनाही एक हजार रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. महाराष्ट्राची लोककला म्हणून गणली जाणाऱ्या शाहिरीच्या माध्यमातूनही उमेदवाराचा प्रचार केला जातो. स्थानिक मुद्दय़ांचा वापर करून तयार केलेले शाहिरी गीत शाहिरांकडून मतदारांसमोर सादर केले जात असून त्या माध्यमातूनही उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. शाहिरांनी किती ठिकाणी कार्यक्रम करायचे ठरले आहे.

पथानाटय़ांच्या माध्यामातून मतदानाबद्दलची जागृती करण्यासाठी आम्ही एक पथक तयार केले आहे. काही व्यावसायिक पथके ठराविक रक्कम घेऊन प्रचार किंवा जनजागृती करत असली तरी आम्ही मिळेल त्या मानधनावर पथनाटय़ सादर करून मतदानाबाबत जागृती करत आहोत.

-चंद्रशेखर जोशी, नाटय़ कलावंत, निगडी प्राधिकरण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Public artists and path plays with great respect in election

ताज्या बातम्या