सुरक्षा व्यवस्था हटवल्यानंतर पंजाबी गायक तसेच काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली. याच कारणामुळे पंजाबमधील भगवंत मान सरकारवर चौफेर टीका केली जात आहे. असे असतानाच आता पंजाब सरकार ज्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली होती त्या ४०० महत्त्वाच्या व्यक्तींना पुन्हा एकदा सुरक्षा पुरवणार आहे. तशी माहिती सरकारने पंजाब आणि हरियाणामधील उच्च न्यायालयात दिली आहे. येत्या ७ जूनपासून या महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा बहाल केली जाईल.
हेही वाचा >>> उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, सम्राट पृथ्वीराज चित्रपट केला करमुक्त
काही दिसवसांपूर्वी पंजाबमधील भगवंत मान सरकारने राज्यातील काही माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, पंजाब सरकारने न्यायालयात महत्त्वाच्या व्यक्तींना पुन्हा एकदा सुरक्षा बहाल केली जाईल असे सांगितले. येत्या ६ जून रोजी ऑपरेशन ब्लू स्टारचा वर्धापनदिन आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचे नियोजन होते. याच कारणामुळे राज्यातील ४०० पेक्षा जास्त महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेतली होती, असे स्पष्टीकरण पंजाब सरकारने कोर्टासमोर दिले.
हेही वाचा >>> भाजपात प्रवेश करण्याआधीच हार्दिक पटेल यांनी कसली कंबर; पक्षविस्तारासाठी आखला ‘हा’ खास प्लॅन
दरम्यान रविवारी (२९ मे) पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यातील जावाहके या गावात भर दिवसा गोळ्या झाडून हात्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद संपूर्ण पंजाबमध्ये उमटले. पंजाब सरकारने मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही हत्या करण्यात आली. या हत्येनंतर पंजाबमधील सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती.