नायब राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी

पीटीआय, जम्मू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांनी काश्मिरी पंडितांवर सरकारने अन्याय केल्याचा आरोप सोमवारी केला. पंतप्रधान योजनेंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ‘भीक मागू नये’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी माफी मागावी, अशी मागणीही राहुल यांनी केली.

तत्पूर्वी, काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने सोमवारी भारत जोडो यात्रेदरम्यान सांबा जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दहशतवाद्यांकडून लक्ष्य करून होत असलेल्या पंडितांच्या हत्या व पंतप्रधानांच्या योजनेंतर्गत रोजगार मिळवणाऱ्या नागरिकांचे विरोधाचे मुद्दे आदी विविध समस्यांवर राहुल यांच्याशी चर्चा केली.

दिवसभर जम्मू येथील यात्रेनंतर दिवसाअखेरीस सतवारी येथे जाहीर सभेत राहुल म्हणाले, की हे सरकार काश्मिरी पंडितांवर अन्याय करत आहे. आज काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने मला भेटून त्यांच्या समस्या सांगितल्या. मला हे ऐकून आश्चर्य वाटले की नायब राज्यपालांनी त्यांच्या शिष्टमंडळास भीक मागू नका असे म्हटले होते. मी नायब राज्यपालांना सांगू इच्छितो, की काश्मिरी पंडित भीक मागत नाहीत तर त्यांचे हक्क मागत आहेत. नायब राज्यपालांनी काश्मिरी पंडितांची माफी मागितली पाहिजे.

काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाचे सदस्य अमित कौल म्हणाले, की राहुल गांधींना जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाजवळील पंडितांच्या ‘जगती टाउनशिप’मध्ये आमंत्रित केले आहे व काश्मीरला जाताना ते पंडित समाजाच्या सदस्यांना भेटण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi accused kashmiri pandits of injustice by the government amy
First published on: 24-01-2023 at 00:02 IST