Rahul Gandhi asks Date of Caste Census : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. रस्त्यांपासून ते संसदेपर्यंत राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकार आता ही मागणी पूर्ण करणार आहे. याबद्दल राहुल गांधी म्हणाले, “केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायला उशीर केला आहे, पण ठीक आहे, आता त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी.”
राहुल गांधी म्हणाले, “सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मात्र आमच्या काही मागण्या आहेत. त्यापैकी प्रमुख मागणी म्हणजे सरकारने आम्हाला तारीख सांगावी. जातीनिहाय जनगणना कधी सुरू करणार व अंतिम अहवाल कधी सादर करणार याची तारीख आम्हाला सांगायला हवी.”
अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी लागेल : राहुल गांधी
काँग्रेस खासदार म्हणाले, “सरकारने जातीनिहाय जनगणनेला उशीर केला असला तरी हे काम आता तातडीने व्हायला हवं. या उशिरा सुचलेल्या शहाणपणाचंही आम्ही स्वागत करतो. सरकारने आमचं स्वप्न निवडलं हे एक चांगलं काम केलं आहे. आता त्यांनी आम्हाला तारखा सांगाव्यात. जातीनिहाय जनगणना कधी सुरू करणार, कधीपर्यंत काम संपवून अहवाल सादर करणार? नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात जनगणनेसाठी निधीची तरतूद केली नव्हती. मात्र आता तशी तरतूद करावी लागेल. आगामी अर्थसंकल्पात तशी तरतूद करणार का? या प्रश्नांची उत्तरं द्यावी.”
काँग्रेस अध्यक्ष खर्गे काय म्हणाले?
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सातत्याने ही मागणी लावून धरली होती. या आंदोलनाचं नेतृत्व राहुल गांधी यांनी केलं होतं. आज मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. हे एक स्तुत्य पाऊल आहे. आम्ही पूर्वीपासून याची मागणी करत होतो. आता सरकारने त्वरित ही जगनणना पूर्ण करावी.