राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काश्मीरचे सत्य जनतेसमोर आले आहे असं म्हणत रोखठोक या आपल्या सदरातून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. भारत जोडो यात्रेची हेटाळणी मोदी सरकारमधले मंत्री आणि भाजपाने केली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद वाढतोच आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातल्या हिंदू मुस्लिमांना विचार करायला भाग पाडले आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मिरी पंडित कोणत्या स्थितीत आहेत?

ज्या काश्मिरी पंडितांच्या हत्येचा आणि घरवापसीचा प्रपोगंडा भाजपाने राजकारणासाठी केला ते काश्मिरी पंडित आज नेमक्या कोणत्या स्थितीत जगत आहेत? त्यामागचे सत्य हे आहे की काश्मिरी पंडित आजही भीतीच्याच छायेत आहे. जम्मूत मी उतरलो तेव्हा मला सांगण्यात आलं की काश्मिरी पंडित आणि त्यांची कुटुंबं मोठ्या संख्येने जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर आंदोलन करत आहेत. हे सगळे सरकारी कर्मचारी आहेत. काश्मीर खोऱ्यात त्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. काश्मिरी पंडित जम्मूत परत आले पण अतिरेकी हे काही ओळखपत्र पाहून गोळ्या घालत नाहीत. त्यामुळे आमची बदली करा अशी मागणी हे पंडित करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे पगार सरकारने बंद केले आहेत त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जयजयकार

मी जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार केला. आंदोलनात माझ्याशी अनेकांनी मराठीतून संवाद साधला. मला आश्चर्य वाटल्यावर मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की ही सगळी बाळासाहेब ठाकरे यांची कृपा आहे. काश्मिरी पंडितांसाठी त्यांनी महाराष्ट्राचे दरवाजे उघडले म्हणून आम्ही, आमची मुलं पुणे, मुंबईत येऊ शकलो. शिकू शकलो, बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यासाठी जे केले ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही असंही संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

काश्मीर आजही बंदिवान नंदनवन

आजही काश्मीर हे बंदिवान नंदनवन आहे. कलम ३७० हटवूनही काश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. तरूणांना नोकऱ्या नाहीत आणि बेरोजगारीमुळे त्यांच्यात वैफल्य आलं आहे. ३७० कलम हटवल्यानंतर बाहेरचे उद्योग तिथे येतील हा भ्रम खोटा ठरला आहे. पण विशिष्ट प्रांताचे लोक जम्मून आले आणि त्यांनी व्यापार हाती घेतला हे स्पष्ट आहे.

काश्मिरी पंडितांबाबत राहुल गांधींची भूमिका योग्यच

काश्मिरी पंडितांना भीक नको आहे तर त्यांचा हक्क हवा आहे ही राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेतली. निवृत्त लष्करी अधिकारीही राहुल गांधी यांना भेटले. राहुल गांधी यांच्यासोबत ते ४० मिनिटं चालले. त्यावेळी देशातली अग्निवीर ही योजना कशी फसवी, दिशाभूल करणारी आणि खोगीरभरती करणारी आहे हेदेखील त्यांनी राहुल गांधी यांना सांगितले. भारत जोडो यात्रेवर टीका करण्यात आली. तीन बॉम्बस्फोट घडवण्यात आले. मात्र ही यात्रा थांबलेली नाही. राहुल गांधी यात्रा थांबवतील आणि मागे फिरतील हे सगळे अंदाज खोटे निघाले आहेत. उलट राहुल गांधी यांच्या भारतजोडो यात्रेमुळे काश्मीरचं सत्य जनतेसमोर आलं आहे असंही संजय राऊत यांनी रोखठोक या त्यांच्या सदरात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi bharat jodo yatra has exposed the truth of kashmir to the public says sanjay raut scj
First published on: 29-01-2023 at 07:42 IST