नवी दिल्ली : महाभारतात रचलेल्या ‘चक्रव्यूहा’ची तुलना करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. भाजपचा हा चक्रव्यूह ‘इंडिया’ आघाडी भेदून काढेल. त्यासाठी हमीभाव आणि जातनिहाय जनगणना करणे हाच पर्याय आहे, असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात गांधी यांनी शेतकरी, युवा, महिला, कामगार, लघु-उद्याोजक, दलित-आदिवासी, ओबीसींची तुलना अभिमन्यूशी केली. सहा जणांनी अभिमन्यूची हत्या केली. आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्याोगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या सहा जणांनी हा आधुनिक चक्रव्यूह रचल्याचा आरोप गांधी यांनी केला. या लोकसभेतच ‘इंडिया’ आघाडी हमीभावाचा कायदा आणि जातगणना संमत करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मध्यमवर्गही भाजपपासून दूर जात असल्याचा दावा गांधी यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चक्रव्यूहा’चे दुसरे नाव ‘पद्माव्यूह’ असेही आहे. कमळाच्या आकाराचे व्यूह असा याचा अर्थ आहे. आधुनिक ‘कमळ’रूपी चक्रव्यूहात अख्ख्या देशाची होरपळ सुरू आहे. सगळीकडे हिंसा आणि भयाचे वातावरण आहे. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा