कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही, असे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मंगळवारी व्यक्त केले. मोदी पंतप्रधानपदी येणे देशाच्या दृष्टीने घातक असल्याची प्रतिक्रिया देणारे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावर मात्र सिन्हा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सिन्हा म्हणाले, राहुल गांधी यांची अवस्था सध्या झाकलेल्या मुठीसारखी आहे. त्यामुळे त्यांची तुलना मोदी यांच्याबरोबर होऊच शकत नाही. मोदी यांची लोकप्रियता सध्या सर्वाधिक उंचीवर आहे. गुजरातसारख्या राज्यामध्ये त्यांनी सलग तीन वेळा सत्ता मिळवली आहे. लोकप्रियता आणि उत्तम शासनाच्या आधारावरच त्यांनी हे यश संपादन केले. त्यामुळेच त्यांची राहुल गांधीसोबत तुलनाच होऊ शकत नाही. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हे उत्तम उमेदवार असल्याचे मनमोहन सिंग यांचे वक्तव्य दिवास्वप्न असल्याची टीकाही सिन्हा यांनी केली.