दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स पोलिसांनी काढायला सुरुवात केलीय. टिकरी सीमेनंतर आता शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) गाझीपूर सीमेवरील बॅरिकेट्सही दिल्ली पोलिसांनी हटवले. यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिलीय. पोलिसांनी आंदोलनाच्या भोवतीचे बॅरिकेट्स हटवल्यानं आता संसदेकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मत टिकैत यांनी व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाझीपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग ९ वर शेकडो शेतकरी नोव्हेंबर २०२० पासून आंदोलन करत आहेत. आता दिल्ली पोलीस मजुरांना घेऊन या ठिकाणी दाखल झालेत. हे मजुर आंदोलनाला रोखण्यासाठी रस्त्यांवर लावलेले खिळे आणि बॅरिकेट्स हटवत आहेत. या ठिकाणी आंदोलन करणाऱ्यांमध्ये भारतीय किसान युनियनच्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात अनेक शेतकरी संघटना एकत्र येऊन केंद्र सरकारच्या नव्या ३ कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. पोलिसांनी बॅरिकेट्स हटवल्यानंतर आता संयुक्त किसान मोर्चा शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवाना काय निर्णय घेतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

“आम्ही आमची पिकं विकण्यासाठी संसदेत जाणार”

राकेश टिकैत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आपली पिकं कुठंही विकू शकतो असं म्हटलंय. त्यामुळे रस्ते सुरू झाल्यानंतर आम्ही आमची पिकं विकण्यासाठी संसदेत जाणार आहोत. आधी आमचे ट्रॅक्टर दिल्लीला जातील. आम्ही रस्ता अडवलेला नाही. रस्ते अडवणे आमच्या आंदोलनाचा भाग नाही.”

“आता केवळ बॅरिकेट्स हटवलेत, लवकरच तिन्ही कृषी कायदेही हटवले जातील”

दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स हटवण्याचं काम सुरू केल्यानंतर काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “आता केवळ दिखाऊपणाचे बॅरिकेट्स हटवले आहेत. लवकरच तिन्ही कृषी कायदे देखील हटवले जातील. अन्नदाता सत्याग्रह जिंदाबाद!”

बॅरिकेट्स का हटवण्यात येत आहेत?

दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हटवत असल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने २१ ऑक्टोबरला दिल्लीच्या सीमेवर सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील रस्ते सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यावर शेतकरी संघटनांनी हे रस्ते दिल्ली पोलिसांनी अडवल्याची भूमिका घेतली होती.

हेही वाचा : “आंदोलनाचा अधिकार मात्र रस्ते अडवण्याचा नाही”, राकेश टिकैत म्हणाले ‘सर्वोच्च न्यायालयानं अगदी बरोबर आहे’

असं असलं तरी अद्यापही शेतकरी आंदोलनाच्या मंचाच्या आजूबाजूचे बॅरिकेट्स हटवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अद्याप पूर्ण वाहतूक सुरळीत झालेली नाही. पोलिसांनी रस्त्यावरील खिळे आणि दगडं हटवले आहेत. त्यामुळे पूर्ण रस्ता मोकळा होण्यास २ दिवसांचा वेळ लागू शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh tikait on delhi police removing barricades at farmers protest delhi border pbs
First published on: 29-10-2021 at 14:24 IST