पीटीआय, बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या सभांनी गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी बंगळूरुत रोड शो केल्यानंतर दुपारी दोन प्रचारसभा घेतल्या, तर काँग्रेस नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी यांनीही तोडीसतोड प्रचारसभा घेऊन जोरदार प्रचार केला.
गेल्या काही दिवसांपासून भाजप, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या तिन्ही प्रमुख पक्षांच्या आघाडीच्या तोफा राज्यभर धडधडत होत्या. भाजपतर्फे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, स्मृती इराणी, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आदींनी प्रचारसभांचा धडाका उडवला. प्रत्येक निवडणुकीनंतर सरकार बदलण्याचा गेल्या ३८ वर्षांचा पायंडा मोडून सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तर भाजपकडून सत्ता खेचायचीच, या निर्धाराने काँग्रेसने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे.
काँग्रेसच्या वतीने माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यासह अनेक नेते प्रचारात उतरले होते. जनता दला(धर्मनिरपेक्ष)नेही स्वबळावर सत्ता आणण्याच्या ईर्षेने प्रचार केला. ८९ वर्षांचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा सुरुवातीला वार्धक्यामुळे प्रचारापासून दूर राहिले होते, मात्र नंतर तेही प्रचारात उतरले. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात ‘राज्यात स्थिर आणि मजबूत’ सरकार आणण्यावर भर दिला. कर्नाटकात बुधवारी (१० मे) विधान सभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणार असून मतमोजणी शनिवारी, १३ मे रोजी होणार आहे.
मान्यतेशिवाय छापील जाहिरात नको!
कोणताही उमेदवार किंवा पक्षाने कर्नाटकातील मतदानाच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यापूर्वी माध्यम प्रमाणपत्र आणि निरीक्षण समितीकडून त्यांना मान्यता घेणे आवश्यक आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने मार्गदर्शक नियमावली जारी केली असून याबाबत संपादकांनाही पत्र पाठविले आहे.