सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर चर्चा सुरु असून संताप व्यक्त केला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत रोज वाढ होत आहे. सध्या पेट्रोलची किंमत 88.73 रुपये प्रतिलिटर झाली असून डिझेलची किंमत 72.83 रुपये प्रतिलिटर झाली आहे. इंधनाचे दर अजून वाढू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या इंधन दराविरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती, ज्याला विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला. विरोधकांचा आरोप आहे की, 2014 मध्ये निवडणूक प्रचारसभांमध्ये वाढत्या इंधन दरावरुन काँग्रेस सरकारवर टीका करणारे मोदी सरकार वाढत्या इंधन दरावर काही भाष्य करत नाही आहे. त्यावेळी रामदेव बाबांनीदेखील युपीए सरकारवर हल्लाबोल केला होता. रामदेव बाबा यांनी नरेंद्र मोदींना जिंकून देण्याचं आवाहन करताना मोदी सरकार सत्तेत आल्यास पेट्रोल 35 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल असा दावा केला होता.

इंडिया टीव्हीचा शो ‘आप की अदालत’ मध्ये सहभागी झालेले रामदेव बाबा जानेवारी 2014 मध्ये बोलले होते की, ‘पेट्रोलची मूळ किंमत 35 रुपये आहे. त्यावर सरकारने 50 टक्के कर लावला आहे’. पुढे ते म्हणाले होते की, येथे तरुण उपस्थित आहेत. तुम्ही तरुणांना कार्यक्रमाला बोलावून चांगलं काम केलंत. ‘मला सांगा तुम्हाला 75-80 रुपयांचं पेट्रोल हवं आहे की 35 रुपयांचं ? मग जो तुम्हाला 35 रुपयाला पेट्रोल देईल त्याला मत देणार की 75-80 रुपयांत देणाऱ्याला ? आज तुम्हाला गॅस सिलेंडर विना सबसिडी 1200 रुपये आणि सबसिडीसोबत 450 रुपयांना मिळतो. जर गॅस सिलेंडर 300 किंवा 400 रुपयांमध्ये मिळत असेल तर तुम्ही त्याला मत देणार की 1200 रुपयात देणाऱ्याला देणार’.

कार्यक्रमात उपस्थित तरुणांनी टाळ्या वाजवून रामदेव बाबांचं समर्थन केलं होतं, तसंच नरेंद्र मोदींना मत देऊ असं म्हटलं होतं. फक्त रामदेव बाबा नाही तर भाजपाच्या अन्य नेत्यांनीही सर्वसामान्यांना हे स्वप्नं दाखवलं होतं. मात्र परिस्थिती अत्यंत उलट असून गेल्या चार वर्षात एकदाही पेट्रोलची किंमत 35 रुपये प्रतिलिटर झालेली नाही. आज पेट्रोलची किंमत 88 रुपये प्रतिलिटर झाली असून लवकरच शंभरी गाठेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.