नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त होणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहेत त्यावर दिल्लीत शुक्रवारपासून तीन दिवस होणाऱ्या प्रांत प्रचारकांच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब केले जाईल, तसेच संघकार्याच्या विस्तारीकरणाच्या कामाचा आढावा घेतला जाईल. या कामातील आव्हाने, अडचणी यांच्यावर सविस्तर चर्चा केली जाईल, अशी माहिती संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संघाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने २०२५-२६ या वर्षात संघाकडून देशव्यापी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक सद्भावनेचा संदेश समाजामध्ये पोहोचवणे हे संघाचे प्रमुख उद्दिष्ट असेल. संघ मुख्यालयामध्ये विजयादशमीपासून शताब्दीवर्षाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल.
सरसंघचालकांचा जाहीर संवाद
शताब्दीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या देशव्यापी दौऱ्याचेही विशेष आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रवासाचे विशेष वेळापत्रक बैठकीमध्ये तयार केले जाईल. दिल्ली, बेंगळूरु, मुंबई व कोलकाता या महानगरांमध्ये भागवत यांचे विशेष संवाद कार्यक्रम होणार असून समाजातील प्रमुख लोकांना निमंत्रण दिले जाईल. २०१८ मध्ये दिल्लीमध्ये विज्ञान भवनात भागवत यांच्या सलग तीन दिवसांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला होता. तसाच कार्यक्रम चार महानगरांमध्ये होईल.
समाजवाद, धर्मनिरपेक्ष यावर चर्चा हवी!
संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट समाजवाद-धर्मनिरपेक्ष या शब्दांवर चर्चा झाली पाहिजे, या सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या विधानामधील भूमिका अगदी स्पष्ट आहे, असे आंबेकर म्हणाले. आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर घाला घातला गेला असताना संविधानामध्ये हे दोन शब्द समाविष्ट केले गेले. ह्यआणीबाणीच्या काळात झालेले अत्याचार विसरून चालणार नाही. त्यावर चर्चा झाली पाहिजे असे होसबाळे म्हणाले.