पाटणा : वेगवेगळ्या धर्मातील लोकांना शांततेत रहायचे असेल तर माणसाचा किंवा गायीचा, कोणाचाही झुंडबळी जाता कामा नये, असे वक्तव्य रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) वरिष्ठ पदाधिकारी इंद्रेशकुमार यांनी केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातनिहाय जनगणनेच्या बाजूने व्यक्त केलेल्या मताबरोबर संघटना उभी असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांचे मत हे सर्व संघ स्वयंसेवकांचे मत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘जात हे वास्तव आहे. आपण ते नाकारू शकत नाही. त्यामुळे जातीचे हे विष जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेक धर्म आहेत आणि असतील, आमचाही तोच दृष्टिकोन आहे. परंतु धार्मिक कट्टरता आणि त्यामुळे होणाऱ्या हिंसाचारापासून आपण सावध राहिले पाहिजे’, असे इंद्रेशकुमार म्हणाले.

हेही वाचा >>> विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान? अशोक चव्हाण यांचा अंदाज

गोरक्षकांनी केलेल्या हत्यांवरून विरोधक भाजपला जबाबदार ठरवत आहेत. यावर इंद्रेशकुमार म्हणाले की, जगातल्या अनेक भागांत लोक मांस खातात. पण गायीबद्दल लोक संवेदनशील आहेत, हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला एक असे वातावरण तयार करायला हवे जिथे ना गायींची हत्या केली जाईल ना माणसांची. आपल्याला विविधतेतील एकता साजरी करायला हवी, असे मत त्यांनी मांडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आरएसएस’च्या बिहार शाखेने एका आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गणेश चतुर्थीला सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता पुढील वर्षी महाशिवरात्रीला होईल. दंगल आणि जातीय भेदभावापासून मुक्त असलेला समाज निर्माण करणे आणि गरीबांविषयी करूणाभाव हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे इंद्रेशकुमार यांनी सांगितले. मधेपुरा जिल्ह्यातील सिंहेश्वर महादेव मंदिर येथे हा कार्यक्रम होत आहे.