पीटीआय, न्यूयॉर्क : ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका त्यात थेट सहभागी झाली होती आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन अण्वस्त्रसज्ज शेजारी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले,’ असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी केला.

भारत-पाकिस्तानमधील संघर्ष संपल्यापासून ट्रम्प यांनी ‘दोन्ही देशांतील संघर्ष माझ्यामुळे थांबला’ असे विधान अनेकदा केले आहे. आता परराष्ट्रमंत्री रुबिओ यांनीही असा दावा केला आहे. अमेरिकेच्या दाव्यावर भारताने कुठल्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीने संघर्ष थांबला नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांतील लष्करी कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात बोलणी झाल्यानंतर संघर्ष थांबल्याचे भारतानेही वारंवार स्पष्ट केले आहे.

काँग्रेसची भाजपवर टीका

भारत-पाकिस्तानमधील संघर्ष अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यामुळे थांबला असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी केल्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. ‘पंतप्रधान मोदी अमेरिकेचे दावे थेट फेटाळून लावायला का घाबरत आहेत,’ असा प्रश्न काँग्रेसने केला.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्रावर टीका केली. रुबिओ यांनीच प्रथम भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याचे सामाजिक माध्यमांवर पोस्ट केले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी आतापर्यंत ३४ वेळा हा दावा केल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.