Russia On US Airstrikes Iran Updates : इस्रायल आणि इराणमधील संघर्षात दररोज वाढ होताना दिसून येत आहे. दोन्ही देश एमकमेकांच्या शहरांवर हवाई हल्ले करत आहेत. या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिकेने सहभागी होत इराणवर मोठे हवाई हल्ले केले. इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करत ते नष्ट केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने थेट अमेरिकेलाही गंभीर इशारा दिला आहे, तर अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला केल्यानंतर जगभरातील अनेक देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही देशांनी अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर इस्रायलबरोबरच्या संघर्षात इराण जशास तसं प्रत्युत्तर देत आहे, यातच अमेरिकेनेही इराणवर हवाई हल्ला केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रशिया इराणच्या मदतीसाठी पुढे का आला नाही? असा सवाल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विचारण्यात आला. त्यावर व्लादिमीर पुतिन यांनी रशियाची सविस्तर भूमिका मांडली आहे.

व्लादिमीर पुतिन काय म्हणाले?

रशियाचे मध्य पूर्वेतील मित्र राष्ट्रांशी चांगले संबंध असल्याचं पुतिन यांनी म्हटलं. सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचाच्या एका सत्रात बोलताना पुतिन म्हणाले की, “मी तुमचं लक्ष वस्तुस्थितीकडे वेधू इच्छितो. सोव्हिएत युनियन आणि रशियन फेडरेशनमधील सुमारे २० लाख लोक इस्रायलमध्ये राहतात. आज हा जवळजवळ रशियन भाषिक देश आहे आणि रशियाच्या इतिहासात आम्ही हे नेहमीच लक्षात घेतो”, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.

“अरब राष्ट्र आणि इस्लामिक देशांशी रशियाचे दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. रशियाच्या लोकसंख्येपैकी १५ टक्के लोक मुस्लिम आहेत. रशिया हा ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये (OIC) देखील प्रतिनिधित्व करत होता. रशियाने गेल्या अनेक दशकांपासून मध्य पूर्वेत एक संतुलन राखलं आहे. मॉस्कोचे इस्रायलशी चांगले संबंध आहेत आणि इराणबरोबरही मजबूत आर्थिक आणि लष्करी संबंध विकसित केले आहेत, त्यामुळे रशियाचे इराणशी देखील विश्वासार्ह संबंध आहेत. रशियाने बुशेहर व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यास मदत केलेली आहे”, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.