जगातील आतापर्यंतची सर्वात पातळ काच शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. अपघातानेच हा शोध लागला असून या काचेची जाडी दोन अणूंइतकी आहे. कॉर्नेल व जर्मनीच्या उल्म विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केलेली काच ही सर्वात पातळ काच म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदली गेली आहे. या काचेचे तावदान इतके पातळ आहे, की त्याचे सिलिकॉन व ऑक्सिजन रेणू हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेने दिसले, असे प्रा. डेव्हिड म्युलर यांनी सांगितले. केवळ दोन अणूंइतकी जाडी व द्विमिती हे या काचेचे वैशिष्टय़ असून हा अपघाताने लागलेला शोध आहे असे ते म्हणाले.
जगात प्रथमच काचेची रचना पाहता आली याचा आपल्याला अभिमान वाटतो असे म्युलर यांनी सांगितले.
या द्विमिती काचेचे उपयोग ट्रान्झिस्टर, अतिशय पातळ घटक- जे संगणक व स्मार्टफोनच्या संस्कारकाची क्रिया आणखी बदलून टाकतील. नॅनो लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
अपघाताने लागलेला शोध
वैज्ञानिक ग्राफिन गे कार्बन अणूंचे द्विमितीय तावदान तयार करीत असताना स्फटिक तयार झाले, पण त्या ग्राफिनवर घाणीसारखा पदार्थ जमलेला दिसला. नंतर निरीक्षण केले असता ती काच होती व सिलिकॉन-ऑक्सिजनच्या अणूंनी बनलेली होती. या प्रयोगातून सुटलेली हवा तांब्याला क्वार्ट्झ स्फटिकाशी क्रिया करायला भाग पाडत होती. क्वार्ट्झ हे सिलिकॉन व ऑक्सिजनचे बनलेले असते. हा काचेचा थर शुद्ध ग्राफिनवर तयार झाला.
वैज्ञानिकांना आता काचेच्या मूलभूत स्वरूपाविषयी माहिती मिळणार आहे. वैज्ञानिकांना ही काच तयार झालेली सहज दिसली नाही. ही काच घन अवस्थेसारखी वागते, पण ती द्रव आहे, आता वैज्ञानिकांना काचेच्या अणूंची छायाचित्रे मिळाली असून ती १९३२ मध्ये काचेच्या अणुरचनेवर संशोधन केलेल्या डब्ल्यू एच झशारियासेन यांनी सांगितलेल्या रचेनशी मिळतीजुळती आहे.