एअर इंडियाच्या विमानात दारुच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने विमानाच्या बिझनेस क्लासमधील एका वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरावर सर्वचस्तरातून तीव्र संतापही व्यक्त केला गेला. तर, या प्रकरणाची तत्काळ दखल घेत टाटा समुहानेही संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी शनिवारी (७ जानेवारी) या प्रकरणी आरोपी शंकर मिश्राला (३४) यास बंगळुरू येथून अटक केली. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं दिसत आहे. कारण, आरोपी शंकर मिश्रा याने दिल्ली न्यायालयासमोर आपल्यावर आरोप फेटाळले. एवढच नाहीतर संबंधित महिलेनेच लघुशंका केल्याचेही त्याने न्यायालयात सांगितले.

सध्या या प्रकरणी शंकर मिश्राच्या अटकेनंतर न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि दोन्ही बाजूंनी युक्तीवाद सुरू आहे. दरम्यान, आज न्यायालयात शंकर मिश्राने केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्ह दिसत आहे. कारण, शंकर मिश्रा यांना त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळत सांगितले की, मी महिलेवर लघुशंका केली नाही. उलट महिलेनेच लघुशंका केली होती. ज्याचा आरोप त्याच्यावर लावला गेला.

शंकर मिश्राचे वकील काय म्हणाले? –

महिलेच्या सीट पर्यंत पोहचणे शक्य नव्हते. कारण, महिलेची सीट ब्लॉक होती. महिलेने स्वत:च लघुशंका केली होती, कारण, त्यांना इनकॉन्टिनेंस नावाचा आजार आहे. त्या एक कथ्थक नृत्यांगणा आहेत आणि ८० टक्के कथ्थक नृत्यांगणांना असा त्रास उद्भवत असतो.

याशिवाय, शंकर मिश्राच्या वकिलाने हेदेखील सांगितले की, महिलेच्या साटीवर केवळ मागूनच पोहचता येत होतं आणि कोणत्याही परिस्थितीत ज्या सीटवर लघुशंका केली गेली, त्या सीटवर समोरील भागातून पोहचणे शक्य नव्हते. तक्रारदार महिलेच्या पाठीमागे बसलेल्या प्रवाशाने कोणतीही तक्रार केलेली नाही.

न्यायाधीश काय म्हणाले? –

विमानातील एका बाजूहून दुसऱ्या बाजूला जाणे अशक्य नाही. न्यायाधीशांना विमानातील बैठक व्यवस्थेच्या आरखड्यावर बोलताना म्हटले की, “मी पण प्रवास केला आहे, कोणत्याही रांगेमधून कोणीही येऊ शकतो आणि कोणत्याही जागेवर जाऊ शकतो.”

एअर इंडियाच्या विमानात सलग दोन वेळा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. एका प्रकरणात २६ नोव्हेंबर रोजी वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी आरोपी शंकर मिश्रा यास पोलिसांनी अटक केली आहे. तर ६ डिसेंबर रोजी घडलेल्या दुसऱ्या प्रकरणात आरोपीने महिलेच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती, या प्रकरणात आरोपीने लेखी माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटले. पहिल्या प्रकरणात पीडित वृद्ध महिलेने स्वतःहून पोलिसांत तक्रार दिल्यामुळे हा प्रकार उजेडात आला. ज्यावेळी हा घृणास्पद प्रकार घडला त्यावेळी विमानातील क्रू सदस्यांनी माझी मदत केली नाही, असा आरोप पीडित महिलेने केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी शंकर मिश्रा अमेरिकेतील आर्थिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेल्स फर्गो (Wells Fargo) या कंपनीत नोकरीला होता. या घटनाक्रमानंतर कंपनीने आरोपीला नोकरीवरून काढून टाकत निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलं, “आमच्या कर्मचाऱ्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांकडून उच्च व्यक्तिगत आणि व्यावसायिक वर्तणुकीची अपेक्षा करतो.”