काँग्रेसचे खासदार शशि थरुर यांनी मंगळवारी थेट उल्लेख टाळत निर्माते विवेक अग्निहोत्री आणि अभिनेते अनुपम खेर यांच्यावर कठोर शब्दात टीका केलीय. आपली मृत पत्नी सुनंदा पुष्करचं नाव ‘द कश्मीर फाइल्स’वरुन सुरु झालेल्या वादामध्ये या दोघांनी मुद्दाम घेतल्याचा आरोप थरुर यांनी केलाय. या तिघांमध्ये मंगळवारी या विषयावरुन ट्विटवर चांगलीच शाब्दिक बाचबाची झाली.

झालं असं की, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामध्ये मुस्लिमांना एकतर्फी दाखवण्यात आणि हिंसेला प्रवृत्त करणारं दाखवण्यात आल्याने सिंगापूरमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आलीय. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ९० च्या दशकामध्ये काश्मीरमधून हिंदू पंडितांनी केलेल्या पलयानाच्या कथानकावर आधारित आहे. या चित्रपटाला सिंगापूरमध्ये परवानगी देण्यात आलेली नाही यासंदर्भात थरुर यांनी एका बातमीचा स्क्रीनशॉर्ट ट्विटवरुन शेअर केलेला. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी, “भारतामध्ये सत्ताधारी पक्ष ज्या कश्मीर फाइल्सचा प्रचार करत आहे तो चित्रपट सिंगापूरमध्ये प्रतिबंधित आहे,” असं म्हटलेलं.

थरुर यांच्या या ट्वटवर प्रतिक्रिया देताना ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लोकप्रिय चित्रपटांची एक यादी शेअर केली ज्यांच्यावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आलीय. हे असे चित्रपट होते ज्यांच्यावर सिंगापूरमध्ये बंदी आहे पण जगभरामध्ये त्यांची फार चर्चा झालीय. तसेच अग्निहोत्री यांनी आपला मुद्दा मांडताना “सिंगापूर सेन्सॉरच्या बाबतीत अविसित देश आहे,” असं म्हटलं.

अग्निहोत्री यांनी थरुर यांना टॅग करुन ट्विट करताना लिहिलं, “प्रिय शशि थरुर, तुमच्या माहितीसाठी, सिंगापूरमध्ये जगातील सर्वात अविकसित सेन्सॉर आहे.” पुढे ते ट्विटमध्ये म्हणतात, “त्यांनी ‘द लास्ट टेम्टेशन्स ऑफ जीसस क्राइस्ट’ या चित्रपटावरही बंदी घातलेली. (तुमच्या मॅडमला विचारुन घ्या) इतकच नाही तर द लिला हॉटेल फाइल्स नावाचा एक रोमॅन्टीक चित्रपटावरही बंदी घालण्यात येईल. कृपया काश्मिरी हिंदू नरसंहारचा मस्करी करणं बंद करा,” असं अग्निहोत्री म्हणाले.

अन्य एका ट्विटमध्ये विवेक अग्निहोत्रींनी विचारलं की सुनंदा पुष्कर एक काश्मिरी हिंदू होत्या का? तसेच काँग्रेसचे खासदार असणाऱ्या थरुर यांनी आपलं ट्विट डिलीट केलं पाहिजे आणि सुनंदाच्या आत्म्याची माफी मागितली पाहिजे, असंही अग्निहोत्री ट्विटमध्ये म्हणाले.

“शशि थरुर, हे खरं आहे का, की स्वर्गीय सुनंदा पुष्कर एक काश्मिरी हिंदू होत्या? हा सोबतचा स्क्रीनशॉर्ट खरा आहे का? जर हो तर हिंदू परंपरेनुसार मरण पावलेल्यांचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला हे ट्विट काढून टाकलं पाहिजे आणि त्यांच्या आत्माची माफी मागितली पाहिजे,” असं अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

यानंतर अनुपम खेर यांनी सुद्धा या वादात उडी घेतली. त्यांनी सुनंदा पुष्कर यांच्या ट्विट थ्रेडचा स्क्रीनशॉर्ट शेअर कर थरुर यांना, “सुनंदासाठी काश्मिरी पंडितांबद्दल थोडीफार संवेदनशीलता दाखवा,” असं म्हटलं.

त्यांनी म्हटलं की, “प्रिय शशि थरुर, काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारासंदर्भात तुमची उदासीनता फार दुखद आहे. काही नाही तर किमान सुनंदासाठी जी स्वत: काश्मिरी होती, तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल थोडी संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि द कश्मीर फाइल्सवर निर्बंध लादणाऱ्या देशाबद्दल तुम्हाला विजय मिळवल्यासारखा आनंद व्हायला नको.”

Anupam Tweet

नंतर ट्विटरवरुन एक पत्रक जारी करताना काँग्रेसचे नेते असणाऱ्या थरुर यांनी, “मी आज सकाळी एक तथ्य मांडणारं वृत्त ट्विट केलं. यामधील माहिती किंवा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल मी कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं, कारण मी तो चित्रपट पाहिला नाही. मी कधीच काश्मिरी पंडितांच्या वेदनांची खिल्ली उडवलेली नाही किंवा त्यांचा अपमान केलेला नाही. त्यांच्या परिस्थितीबद्दल मला पूर्ण कल्पना आहे आणि त्याकडे मी मागील अनेक वर्षांपासून वारंवार लक्ष वेधलं आहे,” असं म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे आपल्या पत्नीचा उल्लेख आल्याबद्दल थरुर यांनी नाराजी व्यक्त केलीय. “माझी दिवंगत पत्नी सुनंदाला या वादामध्ये खेचणं अयोग्य आणि अपमानकारक आहे. तिच्या विचारांबद्दल माझ्यापेक्षा अधिक कोणाला चांगली माहिती नाही. मी तिच्यासोबत सोपोरजवळ बोमाइकजवळ तिच्या वडिलांच्या नष्ट करण्यात आलेल्या घराचे अवशेष पाहण्यासाठी गेलेलो. मी तिच्या काश्मिरी शेजाऱ्यांसोबत तसेच मुस्लीम आणि हिंदू मित्रांसोबत चर्चेत सहभागी झालेले. अनेक गोष्टी मला ठाऊक आहेत. त्यांचं शोषण करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्यांसमोर स्वत:ची बाजू मांडण्यासाठी ती आज जगात नाहीय. तिचा चर्चेवर विश्वास होता, द्वेषावर नाही,” असं थरुर या पत्रकात म्हणालेत.

सिंगापूरमध्ये इन्फॉकम मीडिया डेव्हलपेमंट अथॉरिटीने (आयएमडीए) संस्कृती, समाज आणि युवा मंत्रालयाबरोबरच गृहमंत्रालयासोबतच्या जारी केलेल्या संयुक्त पत्रकामध्ये हा हिंदी चित्रपट सिंगापूरमधील नियमांमध्ये बसत नसल्याचं म्हटलंय.