भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भाजपाचे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेने तिखट शब्दांमध्ये भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. एकीकडे जनता महागाईच्या प्रश्नांमुळे होरपळत असताना भाजपाने पुन्हा एकदा आपणच सर्वात जास्त निवडणूग्रस्त पक्ष असल्याचं दाखवून दिलंय, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. इतकच नाही तर महाराष्ट्रातील सरकार उखडून फेकण्याचं वक्तव्य करणाऱ्या नड्डा यांनाही लेखामधून इशारा देण्यात आलाय.

मोदींचे-भजन कीर्तन…
“भाजपा जनतेचा विश्वास जिंकेल, असे मनोगत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत व्यक्त केले आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नक्की काय घडेल याविषयी बरेच तर्कवितर्क होते, पण पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या यावरच प्रामुख्याने चर्चा झाली. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकू म्हणजे जिंकूच, असाच राष्ट्रीय कार्यकारिणीचा सूर होता. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत असे ठरले की, देशात १० लाख ४० हजार पोलिंग बूथ आहेत आणि २५ डिसेंबरपर्यंत प्रत्येक बूथ स्तरावर भाजपाची कमिटी बनवली जाईल. तेथून पंतप्रधानांची ‘मन की बात’ जनतेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल. एकंदरीत राष्ट्रीय बैठकीत राजकारण, सत्ता, मोदींचे भजन-कीर्तन याशिवाय काहीच घडले नाही,” असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखामधून लगावण्यात आला आहे.

यावर कार्यकारिणीतील कोणाचेच हृदय का जळले नाही?
“भाजपा हा आपल्या देशातील सगळ्यात जास्त निवडणूकग्रस्त पक्ष आहे. वर्षाचे ३६५ दिवस ते फक्त निवडणुकांचाच विचार करीत असतात. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यावर गांभीर्याने चर्चा झाली असती व पंतप्रधान मोदी यांनी त्यावर समारोपाचे मार्गदर्शन केले असते तर देशाला दिशादर्शक ठरले असते. कार्यकारिणीत ‘महागाई’वर कोणीच गांभीर्याने बोलले नाही. पेट्रोल-डिझेल आजही शंभरी पार आहे. गॅस सिलिंडर १००० च्या वर गेले आहे. भाजीपाला सामान्य जनतेस परवडण्यापलीकडे पोहोचला. खाद्यतेलाने १५० चा आकडा पार केला. यावर कार्यकारिणीतील कोणाचेच हृदय का जळले नाही?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

हे सर्व खरेच झाले काय?
“राष्ट्रीय कार्यकारिणी सुरू असतानाच ऐतिहासिक, पण अमानुष नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. नोटबंदीमुळे भ्रष्टाचार नष्ट होईल असे सांगितले होते. काळा पैसा परत देशात येईल, अर्थव्यवस्था ‘कॅशलेस’ होईल, दहशतवाद संपून जाईल, असे सांगितले. हे सर्व खरेच झाले काय? यावर कार्यकारिणीत साधकबाधक चर्चा व्हायला काहीच हरकत नव्हती. या सगळ्या प्रकरणांत जनतेचे हाल झाले. त्यामुळे बेहाल जनतेचा विश्वास भाजपाने गमावला आहे. नोटबंदीमुळे अतिरेक्यांना अर्थपुरवठा करणारा अमली पदार्थांचा व्यापार बंद पडेल, असे जोरात सांगितले गेले. प्रत्यक्षात भाजपाचे हस्तक व पदाधिकारी हे अमली पदार्थांच्या व्यवहारात कसे गुंतले आहेत त्याचा पर्दापाश मुंबईत रोज सुरू आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले
“एनसीबीच्या सुपारीबाज अधिकाऱ्यांच्या टोळीशी ‘जॉइण्ट व्हेंचर्स’ करून ड्रग्जसंदर्भातले खेटे गुन्हे दाखल करायचे. श्रीमंतांच्या पोरांना याबाबत अडकवायचे व खंडण्या उकळायच्या, असा नवा कारभार भाजपापुरस्पृत लोकांच्या सहकार्याने सुरू झाला आहे. त्यासाठी श्रीमंतांच्या मुलांचे अपहरण करण्यापर्यंत मजल गेली. राजकरणात पैसे कमावण्याचा हा नवा उद्योग सुरू झाला आहे व भाजपाचे भागभांडवल या उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतले आहे. हे असे पितळ उघडे पडत असताना एखादा पक्ष जनतेचा विश्वास कसा जिंकेल? जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले, असा काहीसा प्रकार घडत आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त आज भाजपामध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जाते काय?
भाजपा हा एका कुटुंबाभोवती चालणारा पक्ष नाही, तर तो सेवा, संकल्प आणि समर्पण या मूल्यांवर वाटचाल करतो, असे पंतप्रधानांनी कार्यकारणीच्या भाषणामध्ये म्हटले होते. यावरुनही शिवसेनेनं भाजपाला टोला लगावताना, “पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय भाजपाकडे निवडणूक जिंकून देणारा चेहराच नाही. त्यामुळे इतर मोहोऱ्यांनी उगीच फडफड करू नये. सात वर्षांत जनतेचा विश्वास खरोखरच जिंकला असता तर फक्त ‘मोदी मोदी’ करण्याची वेळ पक्षावर आली नसती. भाजपा हा कुटुंबकेंद्रित पक्ष नाही. हा पक्ष एखाद्या कुटुंबाच्या हातात नाही असे श्री. मोदी यांनी सांगितले. कुटुंबकेंद्रित असणे व व्यक्तिकेंद्रित असणे यात फार फरक नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त आज भाजपामध्ये अन्य कुणाचे बोलणे ऐकले जाते काय? राष्ट्रीय कार्यकारिणी वगैरे हा सर्व मुखवटा आहे. भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या जडणघडणीत ज्यांनी हयात घालवली अशा सगळ्यांच ज्येष्ठश्रेष्ठांना आज ‘मार्गदर्शक मंडळा’च्या कोंदणात ‘मानाचे स्थान’ दिले असले तरी हा व्यक्तिकेंद्रित आणि ‘उदो उदो’ राजकीय व्यवस्थेचाच भाग आहे,” असं म्हटलं आहे.

त्यावर दोन ओळींचे दुःख व्यक्त केले असे दिसले नाही
“भारतीय जनता पक्षाची उभारणी व जडणघडण करण्यात आडवाणी यांनी आयुष्य वेचले आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी जनतेचा विश्वास सरळ मार्गाने जिंकला होता. कुटुंबाची सत्ता हा वेगळा भाग, पण व्यक्तिकेंद्रित सत्तेचा पट दोन-चार लोकांच्याच हाती असतो व ते त्याचेच कुटुंब असते. त्या कुटुंबापलीकडे सत्तेचा परिघ सरकत नाही. गांधी घराणे आहेच, पण आज कोणती घराणी सत्ता चालवीत आहेत हे काय देशाला माहीत नाही? निवडणुकांसाठी पैसा येतो पुठून? केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या हुपुमावरून राजकीय दाबदबाव आणत असतात? हे विषय दुर्लक्षित करता येत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. जगाच्या इतिहासात शेतकऱ्यांचे इतके प्रदीर्घ काळ चाललेले आंदोलन कुणी पाहिले नसेल. आतापर्यंत ७०० च्या वर शेतकऱ्यांनी या आंदोलनात बलिदान केले, पण भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यावर दोन ओळींचे दुःख व्यक्त केले असे दिसले नाही. कुत्रा मेल्यावर दिल्लीतील नेते शोकसंदेश जारी करतात, पण शेतकरी आंदोलनात इतके लोक मरूनही लोकसभेत किंवा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शोक प्रस्ताव मंजूर होत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या विषयावर दिल्ली सरकारचे कान उपटले आहेत. श्री. मलिक हे भाजपाने नेमलेले राज्यपाल आहेत, पण ते बेधडकपणे सत्य बोलले आहेत. जनभावना त्यापेक्षा वेगळ्या नाहीत,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरा जपून
“भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी अत्यंत राष्ट्रहिताचे, राष्ट्रीय सुरक्षेचे, महागाईविरोधी असे विचार ठणकावून व्यक्त केले म्हणजे काय? महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका, असा फुसका बॉम्ब त्यांनी फेकला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात चार-पाच किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने १०० घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडायची भाषा करा. सतत दोन वर्षे शर्थ करूनही ठाकरे सरकार मजबूत आहे. दुसऱ्यांना उखडता-उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून,” असा सल्ला लेखाच्या शेवटी देण्यात आलाय.