देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. असे असतानाच ओडिशामध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. बीजेडीचे चार आमदार काही दिवासांपूर्वी भाजपात दाखल झाले होते. आता त्या चार आमदारांना ओडिशा विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्देशानंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच २७ मेपर्यंत त्या नोटीशीवर उत्तर देण्यात सांगण्यात आले आहे.

यामध्ये ओडिशातील निमापाड्याचे आमदार समीर दाश, हिंडोलच्या आमदार सिमराणी नायक, अथमल्लिक आमदार रमेश साई आणि सोरोचे आमदार परशुराम धाडा यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या चारही आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्र का ठरवले जाऊ नये? याचे उत्तर देण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता या आमदारांकडून नोटीशीला काय उत्तर देण्यात येते, ते पाहणे महत्वाच ठरणार आहे.

हेही वाचा : शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य, “पंतप्रधान नरेंद्र मोदीच फक्त राहुल गांधींची टिंगल करतात, पण देश…”

या आमदारांनी का सोडला पक्ष?

बीजेडीच्या चारही आमदारांना पक्षाने विधानसभेचे तिकीट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे ते पक्षात नाराज झाल्याची चर्चा होती. यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी या चारही आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे प्रशांत मुदुली यांनी पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांच्या याचिका सादर केली होती. त्यानंतर या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

ओडिशातील निमापाड्याचे आमदार समीर दाश यांनी बिजू जनता दल सोडताना पक्षावरील आपला विश्वास उडाला असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी या संदर्भात एक व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “मी २००६ पासून बिजू जनता दलासाठी प्रामाणिकपणे काम केलं. मात्र, आता नेतृत्वाचा आमच्यावरील विश्वास उडाला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे”, असं समीर दाश यांनी म्हटलं होतं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात विविध ठिकाणी सभा पार पडल्या. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या ओडिशामध्येही जाहीर सभा पार पडल्या. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता.