लिव्ह-इन-पार्टनर आफताब अमीन पूनावालाने गळा आवळून खून केलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत. शनिवारी पोलिसांनी आफताबला अटक केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन तीन आठवड्यांमध्ये त्याची विल्हेवाट लावल्याचा जबाब आफताबने नोंदवल्यानंतर हे प्रकरण देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. क्रूरपणे श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आफताबला फासावर लटवण्यात यावे अशी मागणी श्रद्धाचे वडील विकास यांनी केली आहे. मात्र आफताबविरोधात पुरावे गोळा करण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत.
१८ मे रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर त्याने पुढील तीन आठवड्यांमध्ये तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीचे पुरावे शोधण्याचं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहेत. दिल्ली पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या या प्रकरणामध्ये तपास करत आहेत. आतापर्यंत या तपासामध्ये काय माहिती समोर आली आहे, कोणाकोणाचे जबाब नोंदवण्यात आलेत हे जाणून घेऊयात १५ मुद्द्यांच्या मदतीने…
१)
पोलिसांनी आफताबने फ्रिज ज्या दुकानातून घेतला होता ते दुकान शोधून काढलं आहे. ज्या फ्रिजमध्ये आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवलो होते तो फ्रिज टिळक इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या दुकानातून विकत घेण्यात आलेला. या फ्रिजच्या विक्रीसंदर्भातील सर्व तपशील पोलिसांनी दुकानदाराकडून घेतला आहे. दुकानदाराचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: मृतदेहाचे ३५ तुकडे ठेवण्यासाठी आफताबने श्रद्धाच्याच पैशाने विकत घेतलेला फ्रिज?
२)
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासारख्या आफताबने ज्या दुकानातून छोटी करवत विकत घेतली होती ते दुकानही पोलिसांनी सोधून काढलं आहे. या करवतीच्या खरेदीसंदर्भातील बिलही पोलिसांनी कागदपत्रांमध्ये जमा केलं आहे.
३)
आफताबला करवत विकणाऱ्या दुकानदाराचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. या दुकानदाराने आफताबला ओळखलं आहे.
नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज
४)
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आफताबने ज्या ऑनलाइन वेबसाईटवरुन गोष्टी मागवल्या होत्या त्या कंपनीशीही पोलिसांनी संपर्क साधला आहे. या कंपनीकडून या प्रकरणामध्ये सर्व माहिती देण्यात येणार आहे. तसेच या कंपनीच्या संबंधित व्यक्तींचा जबाबही पोलीस पुढील दोन तीन दिवसांमध्ये नोंदवणार आहेत.
५)
श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. विकास यांनी आफताब श्रद्धाला वारंवार मारहाण करायचा असा आरोप जबाब नोंदवताना केला आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…
६)
आफताब आणि श्रद्धाच्या शेजाऱ्यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. आफताबच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेकदा या दोघांच्या भांडणाचे आवाज यायचे असं म्हटलं होतं.
७)
पोलिसांनी आफताब आणि श्रद्धाच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवले आहेत. श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नादरने श्रद्धाशी मागील अनेक महिन्यांपासून संपर्क झालेला नाही याबद्दल तिच्या पालघरमधील कुटुंबियांना कळवल्यानंतर या प्रकरणात श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाचा तपास सुरु झाला.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पोलिसांनी ‘तो’ प्रश्न विचारताच आफताब रडू लागला; त्या पैशांमुळे झाला प्रकरणाचा उलगडा
८)
“श्रद्धा आणि आफताब हे २०१८ पासून रिलेशनशीपमध्ये होते. सुरुवातीला ते फार आनंदात होते. त्यानंतर आफताब आपल्याला मारहाण करतो असं श्रद्धा सांगायची. तिला त्याच्याबरोबर नव्हतं राहायचं. तिला त्याला सोडायचं होतं. मात्र असं करणं तिला जमलं नाही आणि ते नोकरीच्या निमित्ताने दिल्लीला स्थायिक झाले,” असं यापूर्वीच श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
९) दिल्लीमधील जनरल सर्जन असणारे डॉक्टर अनिल सिंह यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. हे. १८ मे रोजी आफताबने दिल्लीत छत्तरपूर परिसरातील भाड्याच्या घरात गळा आवळून श्रद्धाचा खून केला होता. त्यानंतर त्याच महिन्यात तो या डॉक्टरकडे उपचारांसाठी गेला होता. आफताबच्या तळहाताला कापलं होतं. त्यावर उपचार घेण्यासाठी तो डॉक्टरांकडे गेला होता. त्यामुळेच श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करतानाच आफताबला ही दुखापत झाली होती का याबद्दल पोलीस तपास करत असल्याने डॉक्टरांचा जबाब महत्त्वाचा आहे.
१०)
“मे महिन्यामध्ये तो माझ्या दवाखान्यात आला होता. त्याच्या उजव्या हाताच्या तळहाताजवळ जखम झाली होती आणि त्यासाठी टाके घालावे लागले होते. तो अस्वस्थ आणि आक्रमक दिसत होता,” असं डॉक्टर अनिल यांनी सांगितलं. तसेच जखम कशी झाली याबद्दल डॉक्टर अनिल यांनी चौकशी केली असता, “फळं कापताना जखम झाली असं त्याने मला सांगितलं आणि औषधांची यादी घेऊन तो निघून गेला,” असं डॉक्टर अनिल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
११)
पोलिसांना मेहरोलीच्या जंगलामध्ये १३ हाडं सापडली आहे. ही हाडं प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. गळा आवळून श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. त्यामुळे पोलिसांनी या जंगलामध्ये नेऊनही आफताबला नेमके मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले यासंदर्भातील माहिती तपासाचा भाग म्हणून विचारली.
१२)
श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचे डीएनएची चाचणी करण्यासाठी नमुने पोलिसांनी गोळा केले आहेत. विकास यांच्या डीएनएबरोबर या हडांचा डीएनए जुळून येतो की नाही हे तपासल्यानंतर ही हाडं श्रद्धाची आहेत की नाही हे स्पष्ट होणार आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी Google चा वापर, मोठा फ्रिज, अगरबत्ती अन्…; आफताबने दिली कबुली
१३)
आफताबने अनेकदा श्रद्धा रागावून घरातून निघून गेल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासामध्ये श्रद्धाचा खून करण्यात आल्यानंतर म्हणजेच १८ मे नंतरही तिचा मोबाईल फोन आफताब आणि ती राहत असलेल्या दिल्लीत छत्तरपूर परिसरात सक्रीय असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही माहितीही आफताबविरोधातील पुरावा म्हणून वापरली जाणार असल्याचे समजते. सुरुवातीला आफताबने २२ मे रोजी श्रद्धा घरातून निघून गेली असा जबाब नोंदवला होता. त्यावेळी श्रद्धा केवळ तिचा मोबाईल फोन घेऊन निघून गेल्याचा दावा आफताबने केला होता.
१४)
ज्या दिवशी श्रद्धाची हत्या केली त्याच दिवशी तिच्या बॅंकेच्या खात्यातून आफताबने ५० हजार रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग केले होते. त्यानंतर २२ ते २६ मे पर्यंत तो एक हजार ते दोन हजार रुपये श्रद्धाच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने काढत होता अशी माहिती श्रद्धाच्या बँक खात्यांचा तपशीलामध्ये म्हणजेच बँक स्टेटमेंटमध्ये आढळून आली आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: आफताबचा धर्म कोणता?, श्रद्धाचं Instagram Id अन्…; भारतीय Google वर काय सर्च करतायत पाहिलं का?
१५)
श्रद्धाच्या मोबाईलवरुन बँक अॅपच्या सहाय्याने आफताबने पैसे खात्यावर वळवले होते. हा व्यवहार झाला तेव्हा फोन मेहरोलीमधील छत्तरपूर परिसरात असल्याचंही तपासामध्ये दिसून आलं. हे तांत्रिक पुरावेही आफताबचा या कटामधील सहभाग आणि त्याने केलेल्या नियोजनासंदर्भातील घटनाक्रम अधोरेखित करणारे आहेत.